पैठण तालुक्यात पाचोडसह चार मंडळात अतिवृष्टी

पैठण तालुक्यात पाचोडसह चार मंडळात अतिवृष्टी

पैठण (प्रतिनिधी)

पाचोडसह परिसरात पुन्हा एकदा मुसळधार पाऊस पडला असून पाचोड विहामांडवा, नांदर बालानगर या चार मंडळात अतिवृष्टी झाल्याने नदी-नाल्यांना पूर आला असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.

दरम्यान सलग आठ तास मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस झाल्याने पाचोड गल्हाटी नदीसह नांदर, विहामांडवा,नवगाव, येथील नद्यांसह अन्य लहान मोठे नद्या ओढे तलाव बंधारे दुथडी भरून वाहू लागल्याने पूर स्थिती निर्माण झाली आहे. तसेच पिकांचे आतोनात नुकसान झाले आहे. नदीकाठच्या दोन्ही बाजूंच्या गावांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहे.

४ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली आहे.या पावसामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले आहे.विहामांडवा जवळील ब्रम्हगाव येथील पुल पावसाने खचून उघडा पडला तर चिंचाला गावालगत तलाव ओव्हरफ्लो होवून तलावामधील पाणी बाहेर वाहून जात आहे.शिवाय तलावातील पाणी पुरवठ्याची विहीर पाण्या खाली बुडाली आहे.

शनिवारी ता.४ राञी आठ वाजता पावसाला प्रारंभ झाला. सलग आठ तास मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस कोसळतच होता. रविवारी दुपारीही पावसाने पाचोड भागात संततधार हजेरी लावली. शनिवारी कोसळलेल्या मुसळधार पावसाने सर्वत्र दाणादाण उडाली शिवाय चोहीकडे नुसते पाणीच पाणी दिसत आहे. ग्रामीण भागातील रस्ते पाण्याखाली गेल्याने अनेक गावांतील संपर्क तुटला आहे. पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला.

दरम्यान पैठण तालुक्यातील पाचोड,(११६) मिलीमीटर, नांदर(१२९) मिलीमीटर, विहामांडवा( १०७) , मिलीमीटर,आणि बालानगर (६८ )मिलीमीटर इतका या भागात अतिवृष्टी सदृष्य मुसळधार पाऊस पडल्याने या भागात पाणीच पाणी झाले असून शेत शिवारामध्ये ओढ्यांचे पाणी घुसल्याने ठिकठिकाणच्या शेतात पाणीच पाणी साचलेले दृष्य पाहावयास मिळते. गावा जवळील लहान मोठ्या तलाव ओढ्यांना पूर परिस्थितीत निर्माण झाल्याने काही गावातील सखल भागात या पावसामुळे पाणी साचले आहे.अनेक ठिकाणी या पावसामुळे पुलावरून पाणी वाहत असल्याने रस्ते बंद पडले आहेत.

मुसळधार पावसाने शेतक-यांत भितीचे वातावरण निर्माण झाली असून, त्यामुळे हातातोंडाशी आलेले खरीपातील पिके मातीमोल होण्याच्या मार्गावर आहे. मात्र सोयाबीन उडीद मूंग पिकाला या पावसाने जबर फाटका बसला आहे.शेतात गुडघ्या इतके पाणी साजल्याने सोयाबीन शेगांना कोंब फुटू लागल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे. यावर्षी सोयाबीन पिकावर कीड रोगाचा फारसा परिणाम जाणवला नसला तरी अति ओलाव्याने बुरशीजन्य रोगाची लागण झाली. ढगाळी वातावरणा मुळे आणि सततच्या पावसामुळे सोयाबीन शेंगा भरण्यावरही मोठा परिणाम झाला आहे. सोयाबीन शेंगा परिपक्व झाल्या नसल्याने उत्पादनात कमालीची घट होणार आहे. संततधार पावसामुळे सोयाबीन पिकांसह उडीद मूग हे पीक हातातून जाते की काय अशी चिंता शेतकऱ्यांना वाटू लागली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com