सुपा |वार्ताहर| Supa

सुपा परिसरात गेल्या आठ दिवसांपासून गुलाबी थंडीचा जोर वाढू लागला आहे. थोडी उशीराने का होईना पण थंडीचे आगमन झाल्याने नागरिकांत हुडहुडी भरली आहे.

महाराष्ट्रात साधारणपणे दिवाळीनंतर थंडीला सुरवात होऊन ती साधारणपणे फेब्रुवारीपर्यंत असते; परंतु चालू वर्षी पावसाळा लांबल्याने अहमदनगर जिल्ह्यात थंडी एक ते दीड महिना उशीरा आली आहे. गेल्या आठ दिवसांपासून थंडीची गुलाबी चाहूल जाणवू लागली आहे. त्यामुळे काही ठिकाणी शेकोट्या पेटू लागल्या आहेत तर रस्त्यावरील चहाच्या टपर्यांवर गर्दी वाढू लागली आहे.

थंडीने अंगात जरी हुडहुडी भरत असली तरी ती आरोग्याच्यादृष्टीने खुप फायदेशीर असते. या मोसमात मनुष्याला सर्दी सोडली तर इतर आरोग्य उत्तम राहते. हिवाळ्याचा मोसम जसा चांगला तसा तो सृष्टीसाठी ही खूप फायद्याचा असतो वृक्षांना, प्राण्यांना व पिकानांही थंडीचा कालावधी खूप लाभदायक असतो.

याच कालावधीत पिकाची वाढ व फलधारणा जोरात होते. साधारणपणे अजून एक ते दीड महिना थंडीचा जोर राहण्याची शक्यता आहे; परंतु चालू वर्षी पावसाळा जवळजवळ दीड ते दोन महिने जास्त वाढला. यावर्षी पाऊस भरपूर झाल्याने थंडीचे प्रमाण जास्त राहून लांबण्याची शक्यता नाकारता येत नाही. थंडीबरोबर सकाळी धुकेही राहणार आहे.

गेल्या चार दिवसांपासून सुपा परिसरात थंडीचा जोर वाढल्याने शेताला पाणी देणारे शेतकरी, दुधवाले व कंपनी कामगार यांची चांगलीच त्रेधात्रिपट उडत आहे. त्यात विद्युत महामंडळ जाणूनबुजून शेती पंपासाठी रात्रीची वीज सोडून बळीराजाच्या अडचणीत भर घालत आहे. तर कंपनी चालकही सर्वसामान्य कामगारांना भल्या पहाटेच कामावर बोलावतात.

त्यामुळे कामगार सकाळी सकाळीच कुडकुडत कंपनीच्या गेटवर उभे राहतात. कुणाला हवीसी कुणाला नकोशी असणारी थंडी आरोग्यासाठी मात्र चांगली असते. नुकतेच चालू सिझनच्या थंडीचे आगमन झाल्याने कुणी शेकोटी पेटवून तर कुणी चहा टपरीवर तीचे स्वागत करत आहे.