
नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अंतर्गत असलेल्या 220 के.व्ही सौंदाळा (भेंडा) उपकेंद्र येथे अतिरिक्त कार्यकारी अभियंता वर्ग 1 या पदावर कार्यरत असलेले शंतनू सूर्यकर या विद्युत अभियंत्यास अज्ञात व्यक्तिने 10 लाख रुपयांच्या खंडणीसाठी परिवारासह जीवे मारण्याची धमकी दिली असून याबाबत त्यांनी नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
श्री.सूर्यकर यांनी फिर्यादीत म्हटले की, त्यांना दि. 25 नोव्हेंबर रोजी दुपारी दीडच्या दरम्यान अज्ञात व्यक्तिचा मोबाईल कॉल आला. त्यात त्याने ‘तुझी कुठे कुठे प्रॉपर्टी आहे? तू कुणाला पैसे दिले आहेत ते मला माहिती आहे, तूकुणाकडेही जा, माझे न ऐकल्यास, मला दहा लाख रुपये न दिल्यास तुला परिवारासह संपवून टाकू’ अशी धमकी दिली. श्री.सूर्यकर यांच्या फिर्यदीवरून नेवासा पोलीस ठाण्यात गु.र.नं 1073 भारतीय दंड विधान कलम 384, 504, 506 नुसार अज्ञात व्यक्तिविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जीवे मारण्याच्या धमकीने नेवासा तालुक्यातील वीज अधिकारी व कर्मचारी वर्गात खळबळ उडाली आहे. दरम्यान नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय करे यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने तपासाची चक्रे फिरवली आहेत. धमकी दिलेल्या मोबाईल नंबर ट्रू कॉलरवर फेक नाव येत असल्याने खर्या व्यक्तीच्या शोध पोलीस घेत आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज मोंढे करीत आहेत.