गैरवर्तन करणार्‍या विस्तार अधिकार्‍यांसह तिघा शिक्षकांवर कारवाई

एक सेवेतून बडतर्फ तर तिघांना आर्थिक दणका
गैरवर्तन करणार्‍या विस्तार अधिकार्‍यांसह तिघा शिक्षकांवर कारवाई

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

अनाधिकृत गैरहजर राहणे, वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न करणे, सहशिक्षक आणि पालकांची गैरवर्तन करणे, तसेच अन्य कारणांमुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी तीन शिक्षकांसह एका विस्तार अधिकार्‍यावर कडक कारवाई केली आहे. यात एका शिक्षकाला नोकरीतून कायम स्वरूपी कमी केले असून एका शिक्षकांची एक वर्षासाठी वेतनवाढ थांबवली असून विस्तार अधिकारी आणि अन्य एका शिक्षकाला त्यांच्या नेमणूकीच्या मूळ पगारावर (समयश्रेणीतील निम्मस्तरावर) आणण्याची शिक्षा सुनावली आहे.

अकोले तालुक्यात खडकी येथील प्राथमिक शिक्षक लक्ष्मण पौलास सुर्यवंशी हे 2017 पासून शाळेवर अनाधिकृत गैरहजर होते. तसेच वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाचे पालन करत नव्हते. 2018 मध्ये जिल्हा परिषदेच्या ऑनलाईन सर्वसाधारण बदल्यांमध्ये कर्जत तालुक्यात बदली होवून देखील ते कामाच्या ठिकाणी हजर झाले नव्हते. यामुळे त्यांच्यावर थेट कामावरून कमी करण्याची शिक्षा त्यांना देण्यात आली आहे.

माळवदवाडी संगमनेर येथील महिला शिक्षिका वैशाली ढुमणे या शाळेत गैरहजर असणे, सहकारी शिक्षक आणि पालकांशी गैरवर्तन करणे, नेवासा पंचायत समितीमधील गटशिक्षणाधिकारी यांच्या बनावट सही आणि शिक्क्यांचा आधारे प्रवरासंगम येथील झेडपीच्या शाळेवर हजर होण्याचा प्रयत्न करणे या प्रकरणी त्यांच्यावर आधीच निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. मात्र, त्यांनी बनावट सही आणि शिक्क्यांचा गैरवापर केल्याचा आरोप अमान्य केल्याचा खुलासा केला होता. तो मान्य करत आणि आणि त्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र ग्राहय धरून त्यांना त्यांच्या नेमणूकीच्या मूळ पगारावर (समयश्रेणीतील निम्मस्तरावर) आणण्याची शिक्षा सुनावली आहे.

संवत्सर (ता. कोपरगाव) येथील शिक्षक सुधीर भगवंता खैरनार हे 2019 ते 2020 या काळात शाळेवर गैरहजर होते. शाळेच्या कामकाजाकडे दुर्लक्ष करत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीस जबाबदार राहणे, वरिष्ठांच्या आदेशाकडे दुर्लक्ष करणे आदी ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. त्यानूसार मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर यांनी शिक्षक खैरनार यांची पुढील वेतन वाढ भविष्यकालीन वेतन वाढीवर परिणाम होईल अशा पध्दतीने एका वर्षासाठी रद्द केली आहे. तर संगमनेर तालुक्यातील वडगावपान बिटचे विस्तार अधिकारी दिपक त्रिभूवन हे रजेचा अर्ज न देता गैरहजर राहणे, कार्यालयीन कामात हलजर्गीपणा करणे आदी ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. मात्र, त्यांनी कौटूंबिक कारण देत आजारपणामुळे गैरहजर राहिल्याचे सांगत कुटूंबांची जबाबदारी त्यांच्यावर असल्याने सौम्य शिक्षा करावी अशी विनंती केली होती. त्यानूसार त्यांच्यावर त्यांच्या नेमणूकीच्या मूळ पगारावर (समयश्रेणीतील निम्मस्तरावर) आणण्याची शिक्षा सुनावली आहे. ही कारवाई मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर यांनी मागील आठ दिवसांत टप्प्याने केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com