मिरी आरोग्य केंद्रात सापडली मुदतबाह्य औषधे

झेडपी सीईओंनी फटकारले : गोरगरिबांच्या जीविताशी खेळू नका
मिरी आरोग्य केंद्रात सापडली मुदतबाह्य औषधे

करंजी (वार्ताहर) - मिरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मुदतबाह्य औषधे आढळल्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी कर्मचार्‍यांना चांगलेच फटकारले. जनतेच्या जीवाशी खेळू नका, जबाबदारीने काम करा अशा शब्दांत त्यांनी कर्मचार्‍यांची चांगलीच कानउघडणी केली.

मिरी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या हवेतून ऑक्सिजन निर्मिती प्लॅन्टचे उद्घाटन क्षीरसागर यांच्या हस्ते झाले. त्यानंतर त्यांनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देत करोना परिस्थितीचा आढावा घेतला. करोनाव्यतिरिक्त दिवसभरात बारा रुग्ण तपासणीसाठी आल्याचे त्यांना सांगण्यात आले. तसेच गेल्या तीन महिन्यांत केवळ तीन महिलांची प्रसूती येथे झाल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. हरिभाऊ गाडे यांनी सांगितले. यावर बारा हजार लोकसंख्येच्या गावात दिवसभरात फक्त बारा लोक तपासणीसाठी येतात. तुमच्यावर लोकांचा विश्‍वास नाही का, अशा शब्दांत मुख्य कार्यकारी अधिकारी क्षीरसागर यांनी आरोग्य कर्मचार्‍यांना चांगलेच फैलावर घेतले.

औषधांच्या स्टॉकची पाहणी करताना रक्त पातळ करणार्‍या क्लोपीडोग्रेल या औषधाची मुदत अडीच महिन्यांपूर्वी संपल्याचे क्षीरसागर यांना आढळले. त्यांनी ही बाब गटविकास अधिकारी शीतल खिंडे यांच्यासह वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गाडे यांच्या निदर्शनास आणून देत दोघांनाही धारेवर धरले. या प्रकाराबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी नेमकी कोणावर आणि काय कारवाई करणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com