अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

डोहाळजेवण म्हटले की आपल्या डोळ्यासमोर गर्भवती महिला आणि तिचे डोहाळे पुरवण्याचा सोहळा येतो.

पण नगरमध्ये चक्क एका पाळीव परदेशी श्वानाचे डोहाळजेवण करण्यात आले.

सावेडी येथील रहिवासी भगवान व प्रभावती कुलकर्णी कुटुंबियांनी लहासा अॅप्सो जातीच्या ल्युसी या श्वानाला पोटच्या मुलीप्रमाणे लाडाने पाळत मोठे केले. त्यांना ल्युसीच्या आयुष्यात प्रथमच नव्या पाहुण्याचं आगमन होणार असल्याची गुड न्यूज कळताच त्यांचा आनंद गगनात मावेना झाला.

तिचेही मुली प्रमाणे साग्रसंगीत डोहाळजेवण साजरे करण्याचा निर्णय घेत जय्यत तयारी केली. महाराष्ट्राचा अस्सल डान्सर या टीव्ही वरील डान्स स्पर्धेतील विजेता व अभिनेता राहुल कुलकर्णी व शैला कुलकर्णी यांनी या अनोख्या सोहळ्याचे आयोजन केले.

सावेडीनाका येथील आर्यवर्त अपार्टमेंटच्या दाराशी स्वागत कमान टाकण्यात आली, सजवलेला झोका व धनुष्यबाण, परिसरात फुलांची सजावट, लाऊडस्पिकरवर पारंपारिक गाणी लावण्यात आली. एवढाच नव्हेतर गर्भवती महिलेला डोहाळजेवणाला ज्याप्रमाणे हिरवी साडी-चोळी घेतली जाते त्याचप्रमाणे ल्युसिलाही खास शिवलेला हिरवा ड्रेस घालून व हेअरस्टाईल करून नटवण्यात आले. परिसरातील महिलांनी तिला औक्षण करून ओटीही भरली.

पेढा की बर्फीच्या वाट्या ल्युसी पुढे धरल्या असता तिने बर्फीच पसंत केल्यावर उपस्थित सर्वांनी टाळ्या वाजवून हा आनंदाचा क्षण साजरा केला. गोड अल्पोपहाराने या अनोख्या डोहाळेजेवणाच्या सोहळ्याची सांगता झाली.

यावेळी सह. फौजदार राजेंद्र गर्जे, मोहन जगताप, माधव देशमुख, वरदा जोशी, श्रेय कुलकर्णी, स्वाती शेवाळे, रुपाली मुळे, जानव्ही जोशी, श्रावणी कुलकर्णी, कल्पना जगधने, सुमती जोशी आदी उपस्थित होते.