वाळू माफियांचा प्रवरेच्या गोकुळात उच्छाद

रक्षण करणार्‍यांनीच डोळ्यावर बांधली पट्टी
वाळू माफियांचा प्रवरेच्या गोकुळात उच्छाद

संगमनेर (प्रतिनिधी) / sangamner - वाळूला सध्या सोन्याचे दिवस आल्याने वाळूतस्करांनी प्रवरामाईवर डल्ला मारण्याचे काम सुरु केले आहे. अधिकार्‍यांना चकवा देवून रात्रीच्या वेळी वाळूउपसा करुन त्याची वाहतूक होताना सध्या तालुक्यात दिसत आहे. परवाना असो किंवा नसो मात्र वाळूउपसा जोरात सुरु आहे.

वाळूतून मोठी रक्कम मिळत असल्याने हे वाळूतस्कर विविध गैरधंद्यांना जन्म घालत आहे. प्रशासन मात्र ठप्प आहे. वाळू माफियांनी प्रवरेच्या गोकुळात उच्छाद मांडला असून रक्षणकर्त्यांनी डोळ्यावर पट्टी बांधली आहे. प्रवरामाईला लुटणार्‍या या वाळू माफियांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी निसर्गप्रेमींसह शेतकर्‍यांकडून होत आहे.

तालुक्यातील खांडगाव, कासारादुमाला, जोर्वे, पिंपरणे, धांदरफळ शिवार आदी परिसरातून राजरोसपणे वाळूउपसा होत आहे. मातीमिश्रीत वाळू उपसा परवान्याच्या नावाखाली हजारो ब्रास वाळूउपसा यंत्राच्या सहाय्याने होत आहे. खांडगाव शिवारातून तर रात्रीच्यावेळी बैलगाडीतून वाळू वाहतूक केली जाते. या विरोधात ग्रामस्थांनी नुकतेच आंदोलन केले. प्रशासनाने सदर ठिकाणी जावून जेसीपीच्या सह्याने वाळू वाहतूक होणारे रस्ते खोदून बंद केले. मात्र प्रत्येक ठिकाणी ही कारवाई व्हावी, जेणे करुन वाळूतस्करांना चाप बसेल. मात्र जुजबी कारवाईच्या पुढे प्रशासन काहीच करतांना दिसत नाही. ग्रामस्थ आक्रमक झाले तरी देखील वाळूतस्करांवर अंकुश ठेवण्यात प्रशासन अपुरे पडले.

बैलगाडी, ट्रॅक्टर, डंपर, हायवा या वाहनाच्या माध्यमातून वाळू वाहतूक केली जात आहे. वाळू उपशासाठी वाळूतस्करांनी आता बोटींचा वापर सुरु केला आहे. सोबतच फोकलेन सारख्या महाकाय मशिनरीचा देखील वापर होत आहे. नदीकाठच्या शेतकर्‍यांना या वाळूतस्करांचा मोठा त्रास सहन कारावा लागत आहे. शेतकर्‍यांनी याविरुद्ध आवाज उठवला तर शेतकर्‍यांच्या नदीलगत असलेल्या विहीरीतील मोटरी गायब करण्याचे उद्योग तस्करांकडून होत आहे. तर काही शेतकर्‍यांना दमबाजी देखील केली जात आहे.

नदीपात्रातून वाळूउपसा झाल्याने नदीपात्रालगत असलेल्या विहीरींची पातळी खाली गेली आहे. शेतकर्‍यांच्या शेतीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्याचबरोबर रस्त्यांचीही मोठ्या प्रमाणावर वाट लागली आहे. वाळू माफियांची पिलावळ सर्वत्र पेरलेली असते. त्यामुळे वाळू माफियांचे पंटर अधिकार्‍यांवर लक्ष ठेवून असतात.

अधिकार्‍यांचे चांगभले करण्यात ही पंटर मंडळी माहीर असते. त्यामुळे वाळूउपसा करण्याचा गोरख धंदा राजरोसपणे सुरु आहे. प्रवरा नदीपात्रातून बिनबोभाट वाळूउपसा सुरु आहे. महसूल प्रशासन व पोलीस अधिकार्‍यांची वाहने परिसरात चकरा मारुन जातात मात्र या वाळू माफियांवर कारवाई होतांना दिसत नाही. परिणामी शासनाचा लाखो रुपयांचा महसूलही बुडाला आहे. संबंधित वाळू व माती मिश्रीत वाळूउपसा करणार्‍यांविरुद्ध महाराष्ट्र गौण खनिज अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.

आम्ही दोघे भाऊ भाऊ सारी वाळू मिळून खाऊ...

प्रवरेच्या गोकुळात वाळूतस्करांनी उच्छाद मांडला असतांना रक्षण करणार्‍यांनी डोळ्यावर पट्टी बांधली आहे. कधी काळी भयान शांतता असलेल्या नदीपात्रात आता महाकाय मशिनरींच्या आवाजाने शांततेचा भंग केला आहे.

प्रवरामाईच्या पात्रात पाणी असताना जलविहार करण्यासाठी एकही बोट कधी दिसणार नाही, मात्र वाळू उपसा करण्यासाठी डझनभर बोटी नदीपात्रात दिसू लागल्या आहेत. रात्रंदिवस या बोटींच्या माध्यमातून होणारा वाळू उपसा पर्यावरणाला छेद देत आहे. वाळू तस्करीविरोधात बोंब ठोकणार्‍यांनीच वाळू माफियांना पंखाखाली घेतल्याने रक्षणकर्तेच भक्षणकर्ते बनल्याची खंत निसर्गप्रेमींकडून व्यक्त होत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com