अतिरिक्त ऊस गाळपाची जबाबदारी शेजारील कारखान्यांवर

जिल्हाधिकारी : साखर आयुक्तांना प्रस्ताव सादर करणार || राहाता, श्रीरामपूर आणि नेवाशाचा समावेश
अतिरिक्त ऊस गाळपाची जबाबदारी शेजारील कारखान्यांवर

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar'

जिल्ह्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषत: जिल्ह्याच्या उत्तर भागातील राहाता, श्रीरामपूर आणि नेवासा या तीन तालुक्यांतील उसाचे क्षेत्र जास्त आहे. श्रीरामपूर तालुक्यात सर्वाधिक दोन लाख 25 हजार मेट्रिक टन ऊस आहे. यापैकी एक लाख 40 हजार मेट्रिक टन उसाचे गाळप झाले आहे.

या ठिकाणी 80 हजार मेट्रिक टन अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अतिरिक्त ऊस गाळपाची जबाबदारी शेजारील कारखान्यांवर विभागून वाटप केले जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव राज्याच्या साखर आयुक्तांना सादर करण्यात येणार आहे. असा महत्वपूर्ण निर्णय जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या उपस्थितीमधील बैठकीत घेण्यात आला आहे. दरम्यान 6 जूनपर्यंत गळीत हंगाम बंद करू नये, असेही निर्देश देण्यात आले आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी 30 एप्रिल रोजी खरीप हंगाम नियोजन आढावा बैठक घेतली होती. या बैठकीत जिल्ह्यातील अतिरिक्त उसाच्या गाळपाबाबत पालकमंत्र्यांचे लक्ष लोकप्रतिनिधी आणि शेतकर्‍यांनी वेधले होते. त्यावर त्यांनी जिल्हाधिकार्‍यांना अतिरिक्त ऊस गाळपाचे नियोजन करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यास सांगितले होते. निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, साखर प्रादेशिक संचालक मिलिंद भालेराव, लेखापरीक्षण अधिकारी संतोष पवार आदींच्या उपस्थितीमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

जिल्ह्यात 14 सहकारी आणि नऊ खासगी साखर कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू केला आहे. जिल्ह्यात एक कोटी 73 लाख 30 हजार 13 मेट्रिक टन उसाचे गाळप झाले आहे. एक कोटी 73 लाख 49 हजार 828 क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. साखरेचा सरासरी उतारा 10.1 टक्के आहे.

जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत या उसाच्या गाळपाचे नियोजन करण्यात आले आहे. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना (प्रवरा) यांनी 30 हजार मेट्रिक टन, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना (संगमनेर) यांनी 25 हजार मेट्रिक टन, ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना यांनी 25 मेट्रिक टन उसाचे गाळप करावे. सध्या उन्हाळ्यामुळे ऊस तोडणी मजूर उपलब्ध होत नाहीत. अशा परिस्थितीमध्ये स्थानिक कारखान्याने गाळप बंद झालेल्या साखर कारखान्यांकडील हार्वेस्टर आणून ऊसाची तोडणी करावी, असे निर्देश देण्यात आले आहे. ज्या कारखान्याच्या क्षेत्रात जादा ऊस आहे. त्यांनी 6 जूनपर्यंत गळीत हंगाम बंद करू नये, असे ही निर्देश देण्यात आले आहेत.

दरम्यान जिल्ह्याच्या दक्षिण भागात ऊसाचे क्षेत्र कमी आहे. साखर कारखान्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील नोंदणी झालेले आणि बिगर नोंदणी झालेल्या ऊसाचे गाळप केले आहे. त्यांच्या कार्यक्षेत्रातील ऊस संपला आहे. अशा चार कारखान्यांनी गाळप बंद केले आहे. त्यामध्ये क्रांती शुगर, जय श्रीराम, राहुरी हे कारखाने बंद झाले आहेत. कुकडी, श्रीगोंदे, पियूष, अंबालिका आणि युटेक या कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील उसाच्या गाळप पूर्ण होत आले आहे.

- पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना (प्रवरा) यांना 30 हजार मेट्रिक टन, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना (संगमनेर) यांना 25 हजार मेट्रिक टन, ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना यांना 25 मेट्रिक टन उसाचे गाळप करावे लागणार

- 6 जूनपर्यंत गळीत हंगाम सुरू राहणार

Related Stories

No stories found.