
पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner
शेतजमीनीच्या रस्त्याच्या वादाबाबत न्याय मागण्यासाठी तहसिल कार्यालय येथे आलेले जवळे येथील माजी सैनिक अरूण लक्ष्मण पठारे (वय 62) यांचे तहसिलदारांच्या दालनाच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची घटना सोमवारी (दि.2) सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार जवळे येथील अरूण पठारे माजी सैनिक आहेत. ते आपली शेती करत असून त्यांच्या शेतजमीनी जवळील रस्त्याचा वाद सुरू आहे. त्यासंदर्भात पठारे यांनी न्यायालयात दाद मागून संबंधित निर्णयास न्यायालयाकडून स्थगिती मिळविली होती. या आदेशाची प्रत तहसिलदारांना देण्यासाठी पठारे हे सोमवारी सकाळी तहसिलदार शिवकुमार आवळकंठे यांच्या दालनात आले होते. तेथे गेल्यानंतर ते चक्कर येवून जमीनीवर कोसळले. प्रसंगावधान राखून तहसिलदार आवळकंठे यांनी तात्काळ रूग्णवाहिका पाचारण करून पठारे यांना पारनेर येथील ग्रामीण रूग्णालयात हालविले.
या घटनेची माहीती समजल्यानंतर आमदार नीलेश लंके, संदीप चौधरी, संदीप सालके, नवनाथ रासकर, दीपक मुळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी ग्रामीण रूग्णालयात धाव घेतली.डॉक्टरांनी पठारे यांची तपासणी केली असता ते मृत झाल्याचे घोषीत केले. शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर पठारे यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पठारे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. लष्करातून सेवानिवृत्त झाल्यानंतर पठारे हे शेतीमध्येच रमले होते. त्यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.