पाण्याचा योग्य व गरजेपुरताच वापर करण्याचे बंधन प्रत्येकाने पाळावे : ना. गडाख

पाण्याचा योग्य व गरजेपुरताच वापर करण्याचे बंधन प्रत्येकाने पाळावे : ना. गडाख

नेवासा (तालुका प्रतिनिधी) -

शाश्वत विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टीने जमीन, पाणी संवर्धन गरजेचे असून त्यासाठी प्रशिक्षण आवश्यक आहे. वाल्मी संस्थेच्या

प्रशिक्षणातून हे उद्दिष्ट साध्य करत राज्यात जलसंवर्धनाची नवी पहाट व्हावी.पाण्याचा योग्य व गरजे पुरताच वापर करण्याचे बंधन आपण प्रत्येकाने पाळले पाहिजे तरच उपलब्ध पाणीसाठा आपल्याला आवश्यक प्रमाणात मिळेल असे प्रतिपादन राज्याचे मृद व जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांनी केले.

औरंगाबाद येथील जल व भूमी व्यवस्थापन संस्था (वाल्मी) मध्ये ‘मृद व जलसंधारण, रोजगार हमी योजना आणि आमची माणसे’ या दोन दिवसीय बुद्धिमंथन कार्यशाळेचे उद्घाटन श्री. गडाख यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास रोजगार हमी योजना व फलोत्पादनमंत्री संदीपान भुमरे यांच्यासह आ. रमेश बोरनारे, मृद व जलसंधारण व मग्रारोहयोचे अपर मुख्य सचिव नंदकुमार, मनरेगा आयुक्त शंतनु गोयल, मृद व जलसंधारण आयुक्त तथा वाल्मीचे प्रभारी महासंचालक मधुकर आर्दड, पद्मश्री पोपटराव पवार आदी उपस्थित होते.

जलसंधारणमंत्री श्री. गडाख म्हणाले, राज्याच्या शाश्वत विकासासाठी उपलब्ध जमीन आणि पाणी यांचा सुयोग्य वापर आणि त्यासाठीचे प्रशिक्षण ही काळाची गरज असून याव्दारे आपण राज्याचा, कृषी क्षेत्राचा आणि पर्यायाने शेतकर्‍यांचा विकास साध्य करू शकतो. या प्रशिक्षणामध्ये वाल्मी संस्थेची भूमिका महत्त्वपूर्ण राहणार आहे. कारण जमीन आणि पाणी या नैसर्गिक संसाधनांचा योग्य वापर करून त्यांचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. उपलब्ध जमीन, पाणी या घटकांचा सुनियोजित उपयोग करण्यासाठी शेतकर्‍यांना प्रशिक्षण, मार्गदर्शन मिळणे गरजेचे असून त्यादृष्टीने वाल्मी संस्थेला अधिक बळकट करण्यासाठी कृती आराखडा जलसंधारण विभागातर्फे तयार करण्यात आलेला आहे.

वाल्मी संस्थेच्या माध्यमातून दर्जेदार प्रशिक्षण कार्यक्रम राबवल्या जावेत. त्यासाठीचे परिपूर्ण नियोजन तयार ठेवावे. जेणेकरून अशा कार्यशाळांच्या माध्यमातून व्यापक प्रमाणात समाजापर्यंत शेतकर्‍यांपर्यंत योग्य माहिती व उपाययोजना पोहचविता येतील. महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी सुखी झाला पाहिजे, या उद्देशाने मृद व जलसंधारण विभाग आणि रोहयो, फलोत्पादन विभाग यांनी एकत्रित प्रयत्नातून काम करण्याची गरज असल्याचे श्री. गडाख यावेळी म्हणाले.

रोहयो मंत्री श्री. भुमरे यांनी राज्यात रोजगार हमी योजनेंतर्गत रस्ते, विहिरी, शेततळे, रेशीम लागवडसह अनेक उपयुक्त कामे मोठ्या प्रमाणात करण्यात येत असल्याचे सांगून मनरेगाची जोड देऊन शेती विषयक, मृद व जलसंधारणाची अधिकाधिक कामे करण्यावर भर देण्यात येईल. शेती, शेतकरी यांच्यासाठी ते सहाय्याचे ठरेल. जलसंधारण कामाला गती देण्यासाठी तसेच वाल्मी संस्थेला बळकट करण्यासाठी रोहयो विभाग सहाय्य करेल, असेही श्री. भुमरे यांनी यावेळी सांगितले.

प्रास्ताविक श्री. नंदकुमार यांनी केले. श्री. आर्दड यांनी वाल्मी संस्थेबाबत माहिती दिली. तर प्रा. पुराणिक यांनी आभार मानले. या दोन दिवसीय कार्यशाळेत विविध मान्यवर मग्रारोहयोची भूमिका, आदर्श गाव संकल्पना, शासन निर्णय, विविध अधिकारी अनुभव, पाणी फाऊंडेशनचे काम मृद व जलसंधारण, स्वयंसेवी संस्थांची भूमिका यासह इतर विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com