निळवंडेही ओव्हरफ्लो, प्रवरेला प्रथमच पूर

भंडारदरात धो-धो पाऊस, मुळा धरणातील साठ्यात लक्षणीय वाढ 56 क्यूसेक ने पाणी प्रवरा पात्रात सोडले
निळवंडेही ओव्हरफ्लो, प्रवरेला प्रथमच पूर

अकोले |प्रतिनिधी| Akole

उत्तर नगर जिल्ह्याला वरदान असलेल्या भंडारदरा धरण पाणलोटात धो-धो पाऊस कोसळत असल्याने भंडारदरा पाठोपाठ काल सोमवारी निळवंडेही ओव्हरफ्लो झाले आहे. पाण्याची आवक लक्षात घेता पाणी पातळी नियंत्रणासाठी निळवंडेतील पाणीसाठा स्थिर ठेऊन रात्री 10.45 वाजता धरणातून 20611 क्युसेकने पाणी प्रवरा नदी पात्रात सोडले जात आहे. त्यामुळे या हंगामात प्रवरा नदीला प्रथमच पूर आला आहे.

दरम्यान, पाणी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच नदीवरील सर्व छोटे पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.

मागील पाच दिवसांपासून भंडारदरा व निळवंडे पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे रविवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास भंडारदरा धरण ओव्हरफ्लो झाले.त्यामुळे भंडारदरा धरणातून 4 हजार 400 क्युसेकने पाणी सोडण्यास सुरुवात झाली. हा विसर्ग वाढत जात तो सोमवारी सकाळी 7 हजार 500 क्युसेकपर्यंत वाढविण्यात आला.तर सायंकाळी 6 वाजता 7 हजार 744 विसर्ग करण्यात आला. सायंकाळी 7 वाजता हा गविसर्ग 18856 क्युसेकपर्यंत वाढविण्यात आला. त्यामुळे प्रवरा नदीला पूरस्थिती प्राप्त झाली आहे.

भंडारदरा धरणातून सोडलेले कृष्णवंती या प्रवरेच्या उपनदीचे पाणी, भंडारदर्‍यापासून रंधा धबधब्यापर्यंत दुथडी भरून वाहत असणार्‍या आणि प्रवरा नदीला येऊन मिळणार्‍या ओढे नाल्यांचे पाणी असे सगळे पाणी निळवंडे धरणात जमा होत आहे, त्यामुळे काल सोमवारी दिवसभर तासातासाला निळवंडे धरणाचा पाणीसाठा वाढत गेला,त्यामुळे पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी धरणातून तासागणिक पाणी अधिक प्रमाणात सोडण्यात येत आहे.

काल दिवसभर अकोले तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत होता, मागील दोन तीन दिवसांच्या तुलनेत काल पावसाचा जोर जास्त आहे.त्यामुळे रात्रीतून कदाचित निळवंडेचा आणखी विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवरा नदीला छोटा पूर आला आहे. प्रवरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा जलसंपदा विभागाच्या वतीने देण्यात आला आहे. मोठ्या प्रमाणावर पाणी सोडल्यामुळे प्रवरा नदीवरील अगस्ति सेतू पूलासह, काही सेतु पूल पाण्याखाली गेले आहेत.त्यामुळे तेथील वाहतूक विस्कळीत झाली आहे.

भंडारदरा धरणातून येणारे मोठ्या प्रमाणावरील पाणी आणि निळवंडे पाणलोट क्षेत्रातील पाणी निळवंडे धरणात मोठ्या प्रमाणात साठत होते.यामुळे निळवंडे धरणातील पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. दुपारी दीड वाजेच्या सुमारास धरणातील पाणीसाठा 93 टक्क्यांपर्यंत पोहचला. धरणातील पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आणि धरणावरील वक्र दरवाजातून 2675.35 क्युसेक तर वीज निर्मिती केंद्रातून 685 क्यूसेक असे एकूण 3360.35 क्युसेकने प्रवरा पात्रात पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली.

दुपारी 3 वाजता निळवंडे धरणाच्या पाणी साठ्यात वाढ झाली व तो सुमारे 7778 दलघफुट म्हणजे 93.40 टक्क्यांवर जाऊन पोहचला. त्यामुळे निळवंडे धरणातून प्रवरा नदी पात्रात एकूण 6065 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग करण्यात आला.

निळवंडे धरणात सायं.6 वाजेपर्यंत सुमारे 7832 दलघफुट म्हणजे 94.05 टक्के इतका पाणीसाठा झाला असून निळवंडे धरणातूनस्पीलवे मधून 7459 तर वीज निर्मिती केंद्रातून 685 क्यूसेक असा एकूण 8186 क्युसेक्स विसर्ग प्रवरा नदीत सोडण्यात येत होता.

निळवंडे धरणात सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुमारे 7843 दलघफुट म्हणजे 94.20 टक्के इतका पाणीसाठा झाला असून सद्यस्थितीत निळवंडे धरणातून प्रवरा नदी मध्ये एकूण 10856क्युसेक्सने पाणी विसर्ग सोडण्यात येत आहे.

आढळा पाणलोट क्षेत्रात तुलनेने पावसाचे प्रमाण खुपच कमी आहे,मात्र तेथेही आता बर्‍या पैकी पाऊस पडत असल्यामुळे आढळा नदी वाहती झाली आहे.

सांगवी, पाडोशी हे लघु पाट बंधारे तलाव पहिल्याच पावसात भरले होते. सोमवार पासून आढळेच्या उगम क्षेत्रात पाऊस चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळे आढळा धरणाचा सोमवारी सकाळी 6 वाजता पाणीसाठा 623 दलघफू म्हणजेच 58.77 टक्के झाला होता. मागील तीन- चार दिवसांपासून मुळा,भंडारदरा व निळवंडे पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत आहे. भंडारदरा पाणलोट क्षेत्रातील रतनवाडी येथे 24 तासांत 195 मिमी म्हणजे सुमारे आठ इंच पाऊस पडला.कोतूळ वार्ताहराने कळविले की, हरिश्चंद्रगड, आंबित पाचनई परिसरातील पाऊस टिकून असल्याने मुळा नदीच्या पाणी पातळीत वाढ सुरू आहे. काल सकाळी कोतुळ जवळ मुळा नदीचा विसर्ग 6 हजार 951 क्यूसेक होता. तर मुळा धरणाचा पाणी साठा 22 हजार 914 दलघफु म्हणजेच 90 टक्के झाला होता. पावसाचा जोर लक्षात घेता मुळा धरणही लवकरच भरण्याचे मार्गावर आहे. मुसळधार पावसामुळे कळसुबाई रतनगड हरिशचंद्रगड पर्यंतच्या पट्ट्यातील ओढे नाले दुथडी भरून वहात आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com