साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मिती तारणार!

साखर कारखाना
साखर कारखाना

अस्तगाव (वार्ताहर) / Astgaon - साखर हंगाम 2020-21 मध्ये 306.65 लाख टन साखरेचे उत्पादन झाले. सन 2019-2020 मध्ये 271.11 लाख टन साखर उत्पादन झाले. म्हणजे तब्बल 35.54 लाख टन साखर उत्पादन जास्त झाले. त्यामुळे साखर कारखान्यावर शिल्लक साखरेचा व्याजाचा बोजा दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे साखर कारखाने अडचणीत येण्याची भिती आहे. अशी स्थिती वेळोवेळी साखर कारखान्यांवर येवु शकते. इथेनॉल निर्मिती आणि त्याचे उत्पादन वाढविणे हा यावर रामबाण उपाय आहे, असे या क्षेत्रातील जाणकार सांगतात.

साखर उत्पादन वाढल्याने केंद्र सरकारने 60 लाख टन साखर निर्यातीचा निर्णय घेतला. साखर निर्यातीला अनुदानही दिले. त्यामुळे 58 लाख टन साखर निर्यातीचे करार ही झाले. परंतु मध्यंतरीच्या साखर निर्यात अनुदानात केंद्र सरकारने कपात केली. त्याचा फारसा परिणाम साखर निर्यातीवर झाला नाही.

गेल्या दोन वर्षापासुन देशात व महाराष्ट्रात सरासरी एवढा पाऊस पडला. यावर्षी सुध्दा सरासरी एवढा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे. शेतकर्‍यांना पाण्याची उपलब्धता असल्यास ऊस शेती करण्याकडे त्यांचा कल असतो. याचे कारण कडधान्य, अन्नधान्य या पिकांमध्ये उत्पादनाची हमी नसते. नैसर्गिक संकटामुळे नुकसान होते. उत्पादनाला सरकारने ठरवून दिलेला हमी भावही मिळत नाही. तेलबियांना यावर्षी चांगला भाव मिळाला तर केंद्र सरकारने आयात शुल्कात कपात केली. सरकारच्या धर सोडीच्या धोरणामुळे तलेबियाचे दर स्थिर राहात नाही. याचा परिणाम रास्त व किफायतशिर दर देण्याचे साखर कारखान्यावर कायदेशीर बंधन असल्याने ऊस लागवडीकडे शेतकरी वळतो. पर्यायाने देशात महाराष्ट्रात ऊसाचे उत्पादन कमालीचे वाढते.

ऊसाचे उत्पादन वाढले तर कारखान्यावर जादा साखर उत्पादनाचा व्याजाचा रुपये 250-300 भुर्दंड कारखान्यावर पडतो. यात जमेची बाजु एकच आहे की, केंद्र सरकारने साखरेचे कमीत कमी भाव रुपये 31 प्रतिकिलो ठरवून दिलेले आहेत. नाहीतर यापुर्वीही जादा साखर उत्पादन झाले. त्यावेळी लेव्हि साखरेचा दर 20 रुपये प्रतिकिलो पेक्षा कमी भावात साखर विकण्याची नामुष्की साखर कारखान्यांवर येवुन कोट्यावधी रुपयांचा तोटा साखर कारखान्यांना झाला. त्यामुळे कारखान्यांना अर्थिक संकटातुन बाहेर पडणे अवघड झाले होते.

केंद्र सरकारने इथेनॉल उत्पादन वाढीसाठी भागभांडवल उपलब्ध करुन देण्याचा महत्वपुर्ण निर्णय घेतलेला आहे. त्याचा फायदा कारखान्यांनी घेणे गरजेचे आहे.

इथेनॉल उत्पादन वाढले तर साखर उत्पादन कमी होवुन साखरेला भाव वाढेल. तसेच इथेनॉलचे अतिरिक्त आर्थिक फायदा विचारत घेवून साखर कारखान्यांना ऊसाचा हमीभाव व इथॅनॉलमुळे झालेला अतिरिक्त नफा शेतकर्‍यांना जादा ऊसाचा दर देणे शक्य होईल. त्याचा फायदा शेतकर्‍यांना ऊसाच्या भावाच्या रुपाने होईल. कारखानेही व्यवस्थित चालतील.

इथेनॉल निर्मितीवर भर हवा!

साखरेचा प्रमाणा बाहेरचा शिल्लक साठा कारखान्यावर बोजा ठरत असताना केंद्र सरकारने 25 टक्के इथेनॉल मिश्रीत पेट्रोल विकण्यास परवानगी देवून दिलासा दायक निर्णय घेतला आहे. तसेच रुपये 60 प्रतिलिटर दरम्यान इथेनॉलचे भाव ठरवून दिलेले आहे. तसेच परिवहन खात्याने मल्टीफ्युएल इंजिन बनविण्याचे धोरण वाहन कंपन्यांना ठरवून दिलेले आहे. अशा परिस्थितीत कारखान्यांना अर्थिक संकटातुन बाहेर पडण्यासाठी साखर उत्पादन कमी करुन इथेनॉलचे उत्पादन वाढविणे आवश्यक आहे.

- पी. बी. भातोडे

सेवानिवृत्त कार्यकारी संचालक गणेश कारखाना

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com