ज्युसपासून इथेनॉल बनविणारा कोल्हे कारखाना देशात प्रथम

बिपीन कोल्हे : सभासद शेतकर्‍यांना जास्तीचा 100 रुपये प्रतिटन दर देणार
ज्युसपासून इथेनॉल बनविणारा कोल्हे कारखाना देशात प्रथम

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

पेट्रोलला पर्याय म्हणून जगात ग्रीन हायड्रोजनवर मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू होऊन त्याच्या अंमलबजावणीसाठी त्यातील तज्ञ आता पुढे येऊ लागले आहेत. मात्र माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी स्वतःच्या अभ्यासातून सभासद शेतकर्‍यांच्या सहकार्यातून नवनवीन तंत्रज्ञानाचा आधार घेत काळाच्या कितीतरी अगोदर पुढे जात उसापासून केवळ साखर एके साखर उत्पादन न घेता हायड्रोजनेशनचा पाया घातला.

त्यातून उपपदार्थ निर्मितीबरोबरच औषधी उत्पादने घेतली आणि देशात सर्वप्रथम सहकारी तत्वावर ज्युसपासून इथेनॉल बनविणारा कोल्हे कारखाना ठरला आहे. त्याचे लवकरच पेटंट मिळविणार आहे. उसाला सर्वाधिक भाव देण्याची संजीवनीची परंपरा पुर्वीपासूनची आहे. चालू गळितास सभासद शेतकर्‍यांच्या उसाला आणखी जास्तीचा 100 रुपये प्रति मे. टन दर देणार असल्याचे सुतोवाच सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी केले.

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या 59 व्या गळीत हंगामाची सांगता संचालक प्रदीप नवले, प्रतिभा नवले यांच्याहस्ते तर माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांचे स्वप्न होते सहकारातून ट्रायईथाइल ऑर्थोफॉर्मेट व इ इथॉक्सी मिथाईल मॅलेनिक ईस्टर ही रासायनिक उपपदार्थ तयार करावयाचे त्याच्या प्रत्यक्ष उत्पादनाचाही शुभारंभ संचालक युवानेते विवेक कोल्हे व रेणुकाताई कोल्हे यांच्या हस्ते सोमवारी झाला. त्याप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

प्रारंभी कार्यकारी संचालक बाजीराव सुतार यांनी प्रास्तविकात चालू गळीत हंगामाचा आढावा देऊन यावर्षी आलेल्या अडचणींचे निराकरण पुढील वर्षी करण्यासाठी अभ्यासू अध्यक्ष बिपीन कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली संजीवनीने काय नियोजन हाती घेतले आहे. याबाबतची संपूर्ण माहिती देत कारखान्यास वसंतदादा शुगर इन्स्टीट्यूटकडून मिळालेला सर्वोत्कृष्ट तांत्रीक कार्यक्षमतेचा पुरस्कार स्व. शंकरराव कोल्हे यांना समर्पित केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे व सर्व संचालकांनी उपस्थितांचे स्वागत केले.

याप्रसंगी ज्येष्ठनेते दत्तात्रय कोल्हे, संचालक अरुण येवले, साहेबराव कदम, शिवाजीराव वक्ते, सोपानराव पानगव्हाणे, संजय होन, राजेंद्र कोळपे, फकिरराव बोरनारे, अशोक औताडे, मनेष गाडे, निवृत्ती बनकर, मच्छिद्र लोणारी, ज्ञानेश्वर परजणे, बाळासाहेब नरोडे, अशोकराव भाकरे. विश्वासराव महाले, मच्छिंद्र टेके, कामगार नेते मनोहर शिंदे, वेणुनाथ बोळीज, कैलास माळी, भास्करराव तिरसे, साहेबराव रोहोम, विक्रम पाचोरे, सुनिल देवकर, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, चीफ केमिस्ट विवेक शुक्ला, चीफ इंजिनियर के. के. शाक्य, केन मनेजर जी बी. शिंदे, ऊस विकास अधिकारी शिवाजीराव देवकर, सचिव तुळशीराम कानवडे यांच्यासह विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी, संचालक, खातेप्रमुख, उपखातेप्रमुख, कार्यकर्ते, संजीवनी उद्योग समुहातील सर्व संस्थांचे पदाधिकारी, कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बिपीन कोल्हे म्हणाले, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने इतिहासात प्रथमच उच्चांकी 9 लाख 42 हजार 509 मे. टन उसाचे गाळप केले. कुठल्याही शेतकर्‍याचा ऊस शेतात गाळपाविना राहू नये हे माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांचे सततचे सांगणे असायचे. म्हणूनच हा हंगाम एप्रिल ऐवजी 5 जूनपर्यंत आपल्याला घ्यावा लागला. मात्र चालू वर्षी ऊस तोडणी कामगारांच्या बाबतीत वाईट अनुभव आला. उसाचे उत्पादन वाढते आहे. गाळप क्षमता एका दिवसात वाढत नसते. त्यासाठी पुढच्या हंगामाची तयारी आम्ही आजपासून सुरू केली असून सभासदांच्या मालकीचे हार्वेस्टर झाले पाहिजे यावर आता जोर असणार आहे.

स्व. शंकरराव कोल्हे यांचे आम्हास सातत्याने नवनविन तंत्रज्ञान आत्मसात करा म्हणून सांगणे असायचे. त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी नॅनो टेक्नॉलॉजीवर भर देत येथेच स्वतःच्या सुसज्ज संशोधन प्रयोगशाळा उभारून जागतिक किर्तीचे शास्त्रज्ञ डॉ. यादव यांच्याबरोबरच देश विदेशातील तंत्रज्ञांचे मार्गदर्शन आम्ही घेत असून त्या जोरावर पॅरासिटामोल औषधी उत्पादन घेणार्‍या पहिल्या क्रमांकावर संजीवनीचेच नाव असणार आहे.

विटामिन ए आणि बी यासह इतर 30 औषधांत ट्रायईथाइल ऑर्थोफॉर्मेट व जेनेरीक औषधात इथॉक्सी मिथाईल मैलेनिक ईस्टर या रासायनिक उपपदार्थाचा समावेश आहे. त्याचे उत्पादन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्यात युवानेते विवेक कोल्हे यांच्या कल्पकतेतून सुरू झाले आहे. उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे यांनी आभार मानले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com