करोनाबाधितांच्या उपचारासंदर्भात तपासणीसाठी भरारी पथकाची स्थापना
सार्वमत

करोनाबाधितांच्या उपचारासंदर्भात तपासणीसाठी भरारी पथकाची स्थापना

जिल्हाधिकाऱ्यांनी केले आदेश जारी

Nilesh Jadhav

संगमनेर | प्रतिनिधी | Sangamner

राज्य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी साथरोग अधिनियम 1897 लागू केला आहे. या अधिनियमातील खंड 2, 3 व 4 मधील तरतूदीनुसार अधिसूचना निर्गमित केली असून संबधित जिल्हयाचे जिल्हाधिकारी यांना सक्षम प्राधिकारी घोषित केले आहे.

जिल्हयातील कोविड बाधित रुग्णांना वाजवी दरात उपचार मिळण्यासाठी खाजगी रुग्णालयांनी विविध उपचारांसाठी आकारावयाच्या कमाल दराची मर्यादा निश्चित केली आहे. तसेच खाजगी रुग्णालयांनी उपचारासाठी खाटा उपलब्ध करुन देण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत. तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजना राज्यातील सर्व नागरिकांना लागू करण्यात आली आहे. खाजगी वाहने व रुग्णवाहिका अधिग्रहित करुन जिल्हयातील कोरोना बाधित रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची कार्यपध्दतीही निश्चित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर कोविडबाधित रुग्णांकडून आकारण्यात येणारे शुल्क विहित दरापेक्षा अधिक नसल्याबाबतची तपासणी करणे तसेच नागरिकांना सर्व अंगीकृत रुग्णालयांमार्फत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचा लाभ देण्यात येतो आहे काय, याची तपासणी करण्यासाठी जिल्हाधिकारी, अहमदनगर यांनी तालुकास्तरावर भरारी पथकाची स्थापना केली आहे.

संगमनेर तालुक्यासाठी गट विकास अधिकारी, सुरेश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली, डॉ.संदिप कचोरीया वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय, संगमनेर श्री.वर्पे सहायक लेखाधिकारी, पंचायत समिती, संगमनेर यांचा समावेश असलेल्या भरारी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. तालुक्यातील नागरिकांना कोरोना रुग्णांवरील उपचारासंदर्भात खाजगी हॉस्पिटलने दिलेली सुविधा, रुग्णालयाने आकारलेले देयक तसेच अन्य अडचणीसंदर्भात तक्रार असल्यास सुरेश शिंदे, गट विकास अधिकारी, मोबाईल क्रमांक 9881827697 अथवा डॉ.संदिप कचोरिया वैद्यकीय अधिकारी, मोबाईल क्रमांक 9225499090 यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com