आ. काळेंकडून डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटरला 18 लाखांचे साहित्य

बायपॅप मशीन, मॉनेटर, थ्री पॅरो मॉनेटर, इसीजी मशीनचा समावेश
आ. काळेंकडून डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटरला 18 लाखांचे साहित्य

कोपरगाव (प्रतिनिधी) -

जीवघेण्या करोना संकटात सर्व प्रकारच्या उपाययोजना करण्याबरोबरच ग्रामीण रुग्णालयात सुरु असलेल्या डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटरसाठी आ. आशुतोष काळे यांनी यापूर्वी देखील सर्वोतोपरी मदत केली असून हा मदतीचा ओघ पुढे असाच सुरु ठेवून आज पुन्हा 18 लाख 10 हजार रुपये किंमतीचे मशिनरी दिली आहे.

यामध्ये पाच बायपॅप मशीन, मॉनेटर, थ्री पॅरो मॉनेटर, ऑक्सिजन लाईन 100 पोर्ट, सर्जिकल ट्रॉली, मेडिसिन क्रश कार्ड, इसीजी मशीन आदी साहित्याचा समावेश आहे. त्यामुळे करोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी आरोग्य विभागाला मोठा दिलासा मिळणार आहे.

यावेळी आ. आशुतोष काळे म्हणाले की, कोपरगाव तालुक्यात मागील काही दिवसांपासून करोना बाधित रुग्णाच्या संख्येत दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. जम्बो कोविड केअर सेन्टरच्या माध्यमातून बाधित रुग्णांसाठी सुविधा उपलब्ध आहे. ग्रामीण रुग्णालयाच्या डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये गंभीर रुग्णांवर उपचार सुरु आहेत. मात्र अनेक रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता भासत असल्यामुळे एस.एस.जी.एम. महाविद्यालयाच्या वसतिगृहात प्राथमिक स्वरूपात 100 ऑक्सिजन बेडची तयारी जलदगतीने सुरु असून तळमजल्यावरील सर्व काम पूर्ण झाले आहे.

आज जरी 100 ऑक्सिजन बेडची व्यवस्था करण्याचे नियोजन असेल तरी भविष्यात परिस्थिती पाहून अधिक ऑक्सिजन बेड निर्माण करण्यासाठी प्रयत्न करू. आजपर्यंत आरोग्य विभागाला आवश्यक असणार्‍या सर्व साहित्याची वेळेत पूर्तता केली आहे. यापुढे देखील कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास आपण मदतीसाठी सदैव तयार आहोत. सध्या जरी ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असा तरी ही परिस्थिती लवकरच बदललेली असेल. करोनाचा वाढता प्रकोप पाहता नागरिकांनी अजून काही दिवस अजून सतर्क राहणे गरजेचे आहे. त्यासाठी शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे सर्वांच्या सहकार्याने आपण कोरोना संकटावर पुन्हा नियंत्रण मिळवू, असा आशावाद व्यक्त केला. यावेळी त्यांनी एस.एस.जी.एम. महाविद्यालयाच्या वसतिगृहात 100 ऑक्सिजन बेडची व्यवस्था करण्यासाठी सुरु असलेल्या कामाची पाहणी करून तातडीने काम पूर्ण करण्याच्या त्यांनी सूचना दिल्या.

यावेळी तहसीलदार योगेश चंद्रे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, धरम बागरेचा, राष्ट्रवादीचे गटनेते विरेन बोरावके, मंदार पहाडे, सुनील शिलेदार, राजेंद्र वाकचौरे, डॉ. कृष्णा फुलसौन्दर, तालुका आरोग्याधिकारी डॉ. संतोष विधाते, डॉ. अजय गर्जे, डॉ. वैशाली बडदे आदी उपस्थित होते.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com