श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

शहराच्या विविध भागात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणांची संख्या वाढली असून सध्या दररोज नवीन अतिक्रमणे राजरोसपणे होत आहेत.

नगरपालिकेचे पदाधिकारी, अधिकारी, प्रशासन त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत आहेत.

शहराच्या विविध भागात अतिक्रमणांनी मोठ्या प्रमाणात डोके वर काढले आहे. शिवाजी चौकापासून महात्मा गांधी पुतळा पर्यंतच्या गुरुनानक मार्केटमध्ये अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये बांधकामे सुरू आहेत. यामागे पालिकेतील सत्ताधारी गटातील तसेच विरोधी गटातील काही नगरसेवक यांचा छुपा पाठिंबा असल्याची चर्चा शहरांमध्ये होत आहे.

नेवासा रोडवर देखील अशीच अतिक्रमणे वाढली आहेत. बेलापूर रोडला सुद्धा नवीन अतिक्रमणे झाली आहेत. संगमनेर रोडही अपवाद राहिलेला नाही. शहराच्या मुख्य रस्त्याबरोबरच उपनगरांमधील विविध भागात सुद्धा अतिक्रमणे मोठ्या जोमाने वाढत आहेत. वॉर्ड नंबर 2 मध्ये गुलशन चौकापासून लकी हॉटेल चौकापर्यंत दररोज अतिक्रमण होत आहे.

याबाबत नगरसेवकांना विचारणा केली असता एकमेकांकडे बोटे दाखवली जात आहेत. मात्र नेमका याचा बोलविता धनी कोण याचा शोध नागरिक घेत आहेत.

या भागांमध्ये झालेली घरकुले हिच मुळात चुकीच्या पद्धतीने बांधली गेली आहेत. या घरकुलांच्या दोन्ही बाजूला पार्किंगची कोणतीही सुविधा नसल्याने सर्व वाहने रस्त्यावर असतात आणि आता रस्त्याच्याकडेला मोकळ्या असलेल्या जागेवर सुद्धा लोकांनी आपली दुकाने आणि घरे पुढे वाढवायला सुरुवात केली आहे.

बीफ मार्केट चौकामध्ये लोखंडी टपर्या व शेड मारून श्रीरामपूरचे मालेगाव करून टाकले आहे. परंतु त्यांना रोखणारे कोणी नाही. या भागामध्ये चार नगरसेवक असून सर्वांच्या संमतीने ही अतिक्रमणे वाढत आहेत का ? अशी चर्चा नागरिक करीत आहेत.

या वाढत्या अतिक्रमणांचा दूरगामी परिणाम वाहतुकीवर होणार असून भविष्यामध्ये या भागातून वाहने चालविणे देखील अवघड होणार आहे. मात्र नगरपालिका अतिक्रमण विभाग याबाबतीत अनभिज्ञ आहे. आमच्याकडे तक्रार आली तर आम्ही दखल घेतो असे पालिकेतून सांगण्यात आले.

जोपर्यंत तक्रार येत नाही तोपर्यंत पालिकेने लक्ष द्यायचे नाही का ? असा ही प्रश्न निर्माण होत आहे. पालिकेतील सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांनी भविष्यातील शहराचा विकास आणि सौंदर्य वाढविण्यासाठी आपले राजकीय मतभेद बाजूला ठेवून अतिक्रमणांना पाठिंबा किंवा आशीर्वाद देऊ नये, अशी अपेक्षा सामान्य जनता व्यक्त करीत आहे.

दरम्यान शहरातील सर्व वाढत्या अतिक्रमणांबाबत खंबीर भूमिका घेतली नाही तर अनेक सामाजिक संघटना आंदोलन करण्याच्या पावित्र्यात आहेत. त्यामुळे वाढते अतिक्रमण संदर्भात पालिका कोणती भूमिका घेते याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे.