
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
विळद (ता. नगर) घाटातील विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रशासकीय इमारतीसह इंग्लिश मेडीयम स्कूल चोरट्यांनी फोडले. कागदपत्रे अस्ताव्यस्त करून नुकसान केले आहे. शुक्रवारी (दि. 13) सायंकाळी सहा ते शनिवारी (दि. 14) पहाटे अडीचच्या दरम्यान ही घटना घडली असून याप्रकरणी शनिवारी दुपारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल झाला आहे.
सुरक्षा अधिकारी संतोष कचरू लांडगे (वय 45 रा. देहरे ता. नगर) यांनी फिर्याद दिली आहे. शुक्रवारचे दैनंदिन कामकाज संपल्यानंतर सायंकाळी सहा वाजता अभियांत्रिकी महाविद्यालयाची प्रशासकीय इमारत बंद करण्यात आली होती. त्यानंतर चोरट्यांनी इमारतीच्या पाठीमागील खिडकीचे ग्रील तोडून खिडकीच्या काचा फोडल्या. आत प्रवेश करून सर्व कपाटाचे दरवाजे तोडले व त्यामध्ये ठेवलेले कागदपत्रे अस्ताव्यस्त केली आहे.
त्यानंतर चोरट्यांनी इंग्लिश मेडीयम स्कूलच्या आउट गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चार क्लास रूमसह प्राचार्यांच्या रूमचे कुलूप तोडले व कपाटे, डेबल ड्रॉवर मधील कागदपत्रे अस्ताव्यस्त करून नुकसान केले आहे. दरम्यान, सदरचा प्रकार शनिवारी पहाटे अडीचच्या सुमारास सुरक्षा रक्षकाच्या निदर्शनास आला. त्यांनी एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करून घेतली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक टिक्कल करीत आहेत.