मागणी 29 अन् मिळाले अवघे साडे तीन कोटी

इंग्रजी शाळांना आरटीई प्रवेशाच्या परताव्याची चार वर्षापासून प्रतीक्षा
मागणी 29 अन् मिळाले अवघे साडे तीन कोटी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये 25 टक्के जागांवर प्रवेशित विद्यार्थ्यांचा शुल्क परतावा, मिळत नसल्याने या शाळांचे आर्थिक गणित बिघडले आहे. जिल्ह्यातील इंग्रजी शाळांकडून 29 कोटी प्रतिपूर्ती रकमेची मागणी करण्यात आली. मात्र, शासनाकडून नुकतेच साडेतीन कोटी रुपये शिक्षण विभागाकडे प्राप्त झाले आहेत. त्याचे वाटप पुढील 15 दिवसांत होणार असून ते वेळेत न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा मेस्टाने दिला आहे.

शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये 25 टक्के जागा कमी उत्पन्न गटातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात येतात. या अंतर्गत इंग्रजी माध्यमाच्या कायम विनाअनुदानित शाळांमधील 25 टक्के मोफत प्रवेशित विद्यार्थ्यांचा फी परतावा सत्राच्या सुरुवातीला व नंतर डिसेंबरमध्ये अशा दोन टप्प्यांत शाळांना देण्याचा नियम आहे. त्यामध्ये केंद्र शासन 60 टक्के, तर राज्य शासन 40 टक्के हिस्सा अदा करते. परंतु, चार वर्षांपासून सरकारकडून हा हिस्सा देण्यास दिरंगाई होत आहे. त्यामुळे अनेक शाळांचे बजेट कोलमडले असून, त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होण्याची शक्यता आहे.

याबाबत महाराष्ट्र इंग्रजी शाळा संस्था संघटनेने (मेस्टा) वेळोवेळी मागणी केली. परंतु, शासन ही रक्कम तुकड्या-तुकड्यात देते. नगर जिल्ह्यात 2017 पर्यंतची रक्कम मिळालेली आहे. परंतु, 2018 पासून 2021 पर्यंत सुमारे 29 कोटी रुपये शासनाकडून शाळांना येणे बाकी आहे. दरम्यान, प्राथमिक शिक्षण संचालनालयाने 10 नोव्हेंबर 2022 रोजी राज्यातील सर्व जिल्हा परिषद शिक्षण विभागाला 84 कोटींचा निधी अदा केला आहे.

त्यात नगर जिल्ह्याला 3 कोटी 66 लाख 58 हजार रुपयांचा निधी मिळाला आहे. त्याचे वाटप शिक्षण विभाग पुढील काही दिवसांत करणार आहे.नगर जिल्ह्यात 400 इंग्रजी माध्यमाच्या शाळा असून, दरवर्षी साधारण अडीच ते तीन हजार विद्यार्थी आरटीई अंतर्गत या शाळांमध्ये प्रवेश घेतात. प्रती विद्यार्थी 17 हजार 670 रुपये अनुदान शासन या इंग्रजी शाळांंना देते.

25 टक्के कोट्यात शासनाने राज्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात 200 कोटींची तरतूद केली होती. त्यापैकी 84 कोटी वितरणास मान्यता दिलेली आहे. नगर जिल्ह्याची सन 2020-21 पर्यंत 29 कोटींची मागणी आहे. पैकी जिल्ह्याला 3 कोटी 66 लाख 58 हजार रुपये प्राप्त झाले आहेत. ही तुटपुंजी रक्कम म्हणजे इंग्रजी शाळांच्या तोंडाला पाने पुसल्यासारखे आहे. ही प्राप्त रक्कम शिक्षण विभागाने शाळांच्या खात्यावर त्वरित वितरित करावी. यास विलंब झाला तर मेस्टा संघटनेकडून सनदशीर मार्गाने आंदोलन केले जाईल. राज्य सरकारने हा विषय गांर्भियाने घ्यावा.

- प्रा. देविदास गोडसे, जिल्हाध्यक्ष मेस्टा संघटना.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com