साखरपुडा कार्यक्रमात मुलीचे चोरून व्हिडीओ चित्रीकरण

सावेडीतील घटना || दोन तरुणांविरूध्द गुन्हा
साखरपुडा कार्यक्रमात मुलीचे चोरून व्हिडीओ चित्रीकरण

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

मुलीचा साखरपुडा कार्यक्रम सुरू असताना दोघांनी तिचे चोरून फोटो व व्हिडीओ चित्रीकरण केल्याचा प्रकार बुधवारी (7 जून) रात्री सावेडीतील एका हॉटेलमध्ये घडला. दरम्यान, पीडित मुलीच्या नातेवाईकांनी त्यातील एका मुलाला पकडल्यानंतर त्याने शिवीगाळ करून मुलीच्या आईसोबत गैरवर्तन केले आहे.

पीडित मुलीच्या आईने याबाबत गुरूवारी (8 जून) तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सीराज आलीम काझी व आवेश कैसर काझी (दोघे रा. जुना मंगळवार, नगर) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी यांच्या मुलीचा बुधवारी साखरपुडा होता. त्यादिवशी दुपारी सीराज व आवेश हे त्यांच्या घरासमोर फिरत असताना फिर्यादीने पाहिले. रात्रीच्यावेळी मनमाड रोडवरील एका हॉटेलमध्ये साखरपुडा कार्यक्रम सुरू असताना तेथेही सीराज व आवेश आले.

त्यांनी मुलीचे चोरून फोटो व व्हिडीओ चित्रीकरण केले. सदरचा प्रकार फिर्यादीच्या लक्षात येताच त्यांनी विचारणा केली असता शिवीगाळ करून धक्काबुक्की करत गैरवर्तन केले. तसेच फिर्यादीच्या मुलाला शिवीगाळ केले. त्यातील सीराज आलीम काझी याला नातेवाईकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले असून आवेश कैसर काझी पसार झाला आहे. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास करीत आहेत.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com