वारसा हक्काच्या अंमलबजावणीसाठी मनपा युनियनचा लढा

आजपासून बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा
वारसा हक्काच्या अंमलबजावणीसाठी मनपा युनियनचा लढा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

उच्च न्यायालयाने मनपा कर्मचार्‍यांना वारसा हक्काचा लाभ देण्याबाबत दिलेल्या निकालाची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी महापालिका कामगार युनियने आज 28 एप्रिलपासून बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. कामगार युनियनमार्फत ही याचिका दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने 30 एप्रिलपर्यंत अंमलबजावणीचे आदेश दिल्याचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी सांगितले.

मनपाच्या विविध खात्यातील सेवानिवृत्त कर्मचार्‍यांच्या वारसांना महानगरपालिकेच्या सेवेत वारसा हक्कानुसार सामावून घेण्याबाबत कामगार युनियन व तत्कालीन नगरपरिषदेमध्ये 1979 साली करार झाला होता. मात्र, सन 2000 ते 2005 या काळात या करारानुसार कर्मचार्‍यांच्या वारसांना याचा लाभ मिळाला नाही. यासंदर्भात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात रिटपीटीशन दाखल करण्यात आले होते. खंडपीठाने सुनावणी घेवून वारस अर्जदारांना वारसा हक्काने नेमणुका देण्याबाबत करारातील तरतुदीनुसार वर्ग 3 व वर्ग 4 मध्ये नेमणुका, तसेच कायदेशीर नुकसानभरपाई देण्याबाबत 22 मार्च रोजी अंतिम निकाल दिलेला आहे. निकालाची 30 एप्रिलपर्यंत अंमलबजावणी करण्याचे आदेश महानगरपालिका प्रशासनास दिलेले आहेत.

न्यायालयाच्या निकालाची मनपाने तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी युनियनने केलेली आहे. महानगरपालिका प्रशासनामार्फत कार्यवाही न झाल्यास मनपा विरोधात अवमान याचिका दाखल केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला होता. मात्र, अद्यापही कार्यवाही न झाल्याने युनियनच्या वतीने आज 28 एप्रिलपासून महानगरपालिका कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात येणार असल्याचे लोखंडे यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.