श्रीरामपुरात मुख्य रस्त्यांवर अतिक्रमणांमुळे वाहतुकीचा फज्जा

पोलीस व पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष; बँका कार्यालयांसमोर वाहने पाकिर्ंगची व्यवस्थाच नाही, वाहतूक ठप्प
श्रीरामपुरात मुख्य रस्त्यांवर अतिक्रमणांमुळे वाहतुकीचा फज्जा

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

शहरातील शिवाजीरोड व संगमनेररोड या प्रमुख रस्त्यांवर उभी असलेली वाहने तसेच वाढलेली रहदारी यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. नगरपालिका तसेच वाहतूक शाखेच्या पोलिसांनी याची दखल घेऊन वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

शहराबरोबरच ग्रामीण भागातील व बाहेरगावचे नागरिक विविध कामासाठी शहरात येतात. व्यापार्‍यांना दुकाने उघडी ठेवण्यास सायंकाळी 4 वाजेपर्यंतची वेळ ठरवून देण्यात आली असल्याने त्यापूर्वी खरेदी करण्यासाठी शहरात मोठी गर्दी होत आहे. अनेक दुकानांसमोर वाहने उभी करण्यासाठी जागा नसल्याचे वाहने रस्त्याच्याकडेला दुतर्फा लावली जातात. दुचाकी व चारचाकी वाहनांचा त्यात मोठा भरणा असतो. या वाहनांमुळे इतर वाहनांना जाण्यासाठी जागा अपुरी पडते. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते.

शहरातील मेनरोड, शिवाजी रोड यासह इतर रस्त्यांवरही तीच अवस्था आहे. प्रामुख्याने मेनरोड व शिवाजी रोडवर दिवसातून अनेकदा गर्दीमुळे वाहतुकीची कोंडी होते. शिवाजी रस्त्यावर महाराष्ट्र बँक, नाशिक मर्चंट बँक, बडोदा बँक, एलआयसी, एडीसीसी बँक़, नगरपालिका अशा अस्थापना असल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रामाणात गर्दी होते. या बँक कार्यालयांसमोर वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्थाच नाही. त्यामुळे ग्राहकही आपल्या आडव्यातिडव्या गाड्या लावतात. त्यामुळे निम्मा रस्ता हा वाहन पाकिर्ंगमध्येच अडकला जातो. गर्दीमुळे पायी चालणे मुश्कील होते.

ट्रकसारखे मोठे वाहन अडकल्यास वाहतुकीची कोंडी होते. आणि ही वाहतूक सुरळीत करता करता सर्वसाधारण नागरिकांना एक ते दीड तास रस्त्यावरच अडकून पडावे लागते. अशावेळी अपघाताची शक्यता आहे. मेनरोडसह शिवाजी रोडवरील अनेक दुकानांना पार्कींगची सुविधा नसल्याने वाहनधारक बाजुला वाहने उभी करून खरेदीसाठी निघून जातात. कोंडी झाल्यानंतर ती सुरळीत होण्यासाठी बराच कालावधी जातो. एखाद्या सिरियस रुग्णाला दवाखान्यात न्यायचे असल्यास कसे न्यायचे, असा प्रश्न त्याच्या नातेवाईकांना पडतो.

प्रमुख रस्त्यांवर दररोज अशी वाहतुकीची कोंडी होत असताना नगरपालिका तसेच पोलीस प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. शहरात वाहतुक पोलीसांची नियुक्ती असली तरी ते कुठेही दिसत नाहीत. कधीतरी त्यांचे दर्शन होते. शहरातील दुकानांवर तसेच विना मास्क फिरणार्‍यांवर पोलीस व पालिका प्रशासन कारवाई करून दंडाची आकारणी करतात. त्याचप्रमाणे रस्त्यावर वाहने उभी करणारांवरही कारवाई करण्याची गरज आहे, प्रशासनाने ती कारवाई करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

बँकांशेजारी दुकानांचे अतिक्रमण

शिवाजीरोड व संगमनेररोडवर असलेल्या बँकांशेजारी असलेल्या अनेक दुकानदारांनी रस्त्यावर पाईप टाकून, काहींनी शेड टाकून अतिक्रमण केल्याने बँंकेत येणार्‍या ग्राहकास हा अतिक्रमाणाच्या पुढे आपल्या गाड्या लावून बँकेत कामकाजासाठी जावे लागते. तासनतास बँकेत थांबून रहावे लागत असल्याने गाड्या तशाच रस्त्यावर उभ्या असतात. संगमनेररोडवर तर एक गाडीसुध्दा जाणार नाही अशी अवस्था असते. मात्र याकडे कोणीच लक्ष देत नाही. पोलीस व पालिका ढुंकूनही पहात नाही. शहरातील अतिक्रमण काढणार असे म्हणणार्‍या पालिका प्रशासन याकडे लक्ष का देत नाहीत? असा सवालही विचारला जात आहे. त्यामुळे पालिका व पोलीस प्रशासनाने या दुकानांचे अतिक्रमण तातडीने काढावे तरच श्रीरामपुरातील रस्त्यांवरील वाहतूक सुरळीत होईल.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com