अतिक्रमण कायमस्वरूपी हटवा

व्यापार्‍यांची मागणी || अन्यथा मंगळवारपासून उपोषण
अतिक्रमण कायमस्वरूपी हटवा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

येथील कापड बाजारातील अतिक्रमण हटविण्यासाठी व्यापारी वर्ग एकवटला आहे. जर कायमस्वरूपी अतिक्रम हटविण्यासंदर्भात निर्णय घेतला गेला नाही, तर मंगळवारपासून या परिसरातील सर्व व्यापारी बेमुदत उपोषणाला सुरूवात करतील, असा इशारा व्यापारी महासंघाच्यावतीने देण्यात आला.

नगर शहरातील महत्त्वाच्या असलेल्या कापड बाजार येथे अतिक्रमणाचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. यासंदर्भात व्यापार्‍यांनी शुक्रवारी आपली भूमिका आयोजित पत्र परिषदेत स्पष्ट केली. यावेळी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ईश्वर बोरा, ओमप्रकाश बायड, केतन मुथा, प्रतीक बोगावत, कुणाल भंडारी आदीसह व्यापारी उपस्थित होते. बोरा म्हणाले की, कापड बाजार, घास गल्ली, गंज बाजार, आडते बाजार या महत्त्वाच्या बाजारपेठा आहेत. गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी अतिक्रमणाने विळखा घातल्यामुळे अनेक व्यापारी येथून बाहेर पडत आहेत.

अतिक्रमण धारकांना महानगरपालिकेने स्वतंत्र जागा दिलेली होती. तरी पुन्हा ते दुकानासमोर उभे राहून व्यवसाय करत आहेत. त्याचा त्रास सर्व व्यापार्‍यांना होऊ लागलेला आहे. ग्राहक येण्यास तयार नाही. महानगरपालिकेला वारंवार आम्ही कल्पना देऊन देखील या ठिकाणी अतिक्रमण काढत नाही. मागील आठवड्यात महानगरपालिकेचे आयुक्त तसेच सर्व पदाधिकार्‍यांच्या बैठकीमध्ये अतिक्रमण संदर्भामध्ये तोडगा निघाला होता. त्याची काही प्रमाणामध्ये अंमलबजावणी झाली. मात्र पुन्हा तोच विषय सुरू झालेला आहे. जर अतिक्रमण तसेच राहिले तर आम्ही व्यापार करायचा कसा? हा प्रश्न आहे, असे सांगत बेमुदत उपोषणाचा इशारा देण्यात आला.

बाजारपेठेत अनेकांची दहशत

बाजारपेठेत अनेकांची दहशत आहे. काहीजण याठिकाणी हप्ते मागतात, त्यामुळे व्यापारी सुद्धा हवालदिल झालेला आहे. बाजारपेठेमध्ये महिलांची छेडछाड करण्याचे प्रकार घडत आहेत. व्यापार्‍यांना मारण्याचा प्रकार होतो, ही बाब अतिशय गंभीर आहे. आमचा इतर कोणावर रोष नाही. प्रत्येकाने उदरनिर्वाह करावा. मात्र त्यांना जागा नेमून दिलेल्या आहेत, त्या ठिकाणी जावे. अतिक्रमण कायमस्वरूपी दूर करावे. अन्यथा मंगळवारपासून सर्व व्यापारी या ठिकाणीच उपोषणाला बसतील, असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com