राहुरी शहरातील अतिक्रमण हटाव मोहीम अर्धवट!

पालिका प्रशासनाच्या पक्षपाती धोरणामुळे नागरिक व व्यापारी संतप्त
राहुरी शहरातील अतिक्रमण हटाव मोहीम अर्धवट!

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

राहुरी नगरपरिषद प्रशासनाने पोलीस बंदोबस्त घेऊन शहरातील अतिक्रमणावर कारवाईचा बडगा उगारला. या कारवाईचे राहुरी व्यापारी वर्गातून स्वागत करण्यात येत आहे. मात्र, सुरू असलेली कारवाई अर्धवट सोडल्याने या कारवाईत पक्षपातीपणा झाल्याचा आरोप व्यापारी वर्गातून होत आहे.

राहुरी शहरात अतिक्रमण मोठ्या प्रमाणावर वाढले असून काही व्यापार्‍यांनी रस्त्याच्या मध्यापर्यंत अतिक्रमण केल्याने वाहतुकीस अडथळे निर्माण होत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असल्याने वाहनधारकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत होता. प्रशासनाच्या आवाहनामुळे काही छोट्या-मोठ्या व्यापार्‍यांनी कारवाई होण्या अगोदरच अतिक्रमण काढून घेतले होते.

मात्र दि. 12 मे रोजी सकाळी नगरपरिषद प्रशासनाने पोलीस बंदोबस्त घेऊन अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरूवात केली. नगरपरिषद कार्यालयासमोरील रस्त्यावरील हातगाड्या काढल्यानंतर शिवाजी रोड व शिवाजी चौक परिसरातील अतिक्रमणमध्ये असलेले दुकानासमोरील ओटे, पायर्‍या व नावाचे फलक काढण्यात आले. परंतू, शहरातील जुन्या सरकारी दवाखान्यासमोरील, कॉलेजरोड वरील, प्रगती विद्यालय रोडवरील अतिक्रमण करून थाटलेली दुकाने व टपर्‍या पालिका प्रशासनाने न काढल्यामुळे व्यापारीवर्ग व नागरिकांमधून पालिका प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त होत आहे.

शहरात अतिक्रमण विरोधी मोहिम सुरू झाल्यानंतर राहुरी शहर आता अतिक्रमण मुक्त होईल, अशी भाबडी आशा व्यापारी व नागरिकांना होती. मात्र, ही मोहिम अर्धवट सोडल्याने त्यांचा भ्रमनिरास झाला. या मोहिमेसाठी पोलीस बंदोबस्त ही मोठा होता. तसेच सर्व यंत्रणा सज्ज असताना प्रशासनाची पक्षपाती भुमिका मात्र व्यापारी व नागरिकांनी चांगलीच खटकली आहे. कॉलेज रोडवर अनेक टपर्‍या अतिक्रमणात आहे. त्याचप्रमाणे नेहमीच वाहतुकीची कोंडी होत असलेल्या जुन्या सरकारी दवाखान्यासमोर अतिक्रमणे मात्र काढली नसल्याने याठिकाणी वाहतुकीची कोंडी कायमच राहणार आहे.

दरम्यान राहुरीचे पोलीस निरीक्षक मेघशाम डांगे यांनी पालिका प्रशासनाला अतिक्रमण काढण्यासाठी कितीही फौजफाटा लागला तरी तो पुरविण्याची ग्वाही दिली असल्याचे प्रतिक्रिया त्यांनी आमच्या प्रतिनिधी जवळ व्यक्त केली. तरीही पालिका प्रशासनाने अतिक्रमणाबाबत कोणतीही खास ठोस भुमिका न घेतल्याने त्यांची भुमिका संशयास्पद वाटत असल्याचा आरोप काही नागरिकांनी केला आहे. पालिका प्रशासनाने अतिक्रमणाबाबत कडक भुमिका घेऊन कोणाचाही मुलाहिजा न ठेवता राहुरी शहर अतिक्रमणमुक्त करावे व शहाराचा श्वास मोकळा करावा, अशी मागणी व्यापारीवर्ग व नागरिकांनी केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com