संगमनेरातील ‘त्या’ बांधकामाचे अतिक्रमण काढावयाचे असेल तर वरुन परवानगी आणा

तक्रार करणार्‍यास मुख्याधिकार्‍यांचा सल्ला
संगमनेरातील ‘त्या’ बांधकामाचे अतिक्रमण काढावयाचे असेल तर वरुन परवानगी आणा

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

शहरातील नवीन नगर रोडवरील एका मालमत्ता धारकाला परिषदेच्या बांधकाम विभागाकडून नोटीस बजावण्यात आली असली तरी या जागेवरील अतिक्रमण काढण्यास नगरपालिका प्रशासन तयार नसल्याचे दिसत आहे. या जागेवरील अतिक्रमण काढायचे असेल तर वरून परवानगी आणा, असा सल्ला मुख्याधिकार्‍यांनी संबंधित तक्रारदाराला दिला आहे.

संगमनेर शहरातील नवीन नगर रोड परिसरातील ताजने मळा लगतची जागा गेल्या अनेक वर्षांपासून वादात सापडलेली आहे. नवीन नगर रस्त्यावरील गट सर्व्हे नंबर 149/2 मध्ये प्रभप्रीत कौर दिलीपसिंह पंजाबी यांच्या इमारतीचे बांधकाम सुरु आहे. नगरपरिषदेकडून घेतलेल्या बांधकाम परवान्यापेक्षा त्यांनी वाढीव बांधकाम केले आहे. दर्गाह पीर हजरत फखरुल्लाह बारामासी दर्गाहचे मुख्य विश्वस्त अब्दुल गफ्फार अब्दुल लतीफ शेख यांनी नगरपरिषदेकडे तक्रार केली होती.

केवळ 12 हजार स्क्वेअर सेंटीमीटर बांधकाम क्षेत्रासाठी परवानगी दिली असताना संबंधितांनी बांधकाम परवानगीचा गैरवापर केला आहे. याबाबत दर्गाहाचे मुख्य विश्वस्त शेख यांनी संगमनेर नगर परिषदेच्या मुख्याधिकार्‍यांकडे तक्रार केली होती. शहरातील अतिक्रमण काढण्याची जबाबदारी व अधिकार मुख्याधिकार्‍यांना आहेत. मात्र या जागेवरील अतिक्रमण हटवायचे असेल तर वरून परवानगी आणा असे मुख्याधिकार्‍यांनी आपणास सांगितल्याचे श्री. शेख यांनी दैनिक सार्वमतशी बोलताना सांगितले.

शहरातील छोट्या व्यावसायिकांचे अतिक्रमण हटविण्यास तत्पर असणारे नगरपालिका प्रशासन शहरातील मोठ्या व्यावसायिकांचे अतिक्रमण हटविण्यात का तयार होत नाही असा संतप्त सवाल श्री. शेख यांनी विचारला आहे. संगमनेर नगरपालिकेने सदर जागेवरील अतिक्रमण त्वरित हटवावे, अशी मागणी श्री. शेख यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com