अतिक्रमणधारकांनी मांडला रस्त्यावरच व्यवसाय

श्रीरामपूर-बेलापूर रस्ता चौपदरीकरणाचा हेतू साध्य होणार का?
अतिक्रमणधारकांनी मांडला रस्त्यावरच व्यवसाय

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर-बेलापूर रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. मात्र या कामात अडथळा ठरणारे अतिक्रमण काही प्रमाणात काढले असले तरी रस्त्यालगतच्या व्यावसायिकांनी आपले व्यवसाय रस्त्यावरच मांडले आहेत. त्यामुळे रस्ता रुंदीकरण केले तरी ते करण्याचा हेतू साध्य होईल का? याबाबत शंका उपस्थित होत आहे.

गेल्या अनेक वषार्र्ांसून प्रलंबीत असलेल्या या राज्यमार्गाच्या रुंदीकरणाचे काम श्रीरामपूरचे आ. लहू कानडे यांच्या पुढाकाराने सुरू झाले आहे. या कामातील महत्त्वाचा अडथळा ठरणारे श्रीरामपूर-बेलापूर रस्त्यावरील वेस ते मोसंबी बाग या दरम्यानचे अतिक्रमण बांधकाम विभागाने काही प्रमणात काढले. मात्र गायकवाडवस्ती भागात रस्त्याच्या पूर्वेंला व्यावसायिकांचे अतिक्रमण काढताना फक्त रस्ता काम करण्यासाठी आवश्यक तेवढेच अतिक्रमण काढून ठेकेदाराने आपले काम चालू केले आहे. व्यावसायिकांनीही आपली दुकाने मागे घेताना बांधकाम विभाग व पाटबंधारे विभागाच्या जागेवर अतिक्रमण केले आहे.

या रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणावर चारचाकी वाहन दुरुस्ती करणारांनी आपले व्यावसाय थाटले आहेत. या व्यावसायिकांच्या शेडचे समोरचे अतिक्रमण काढले असले तरी हे व्यावसायिक रस्त्यावरच वाहने उभी करून आपला व्यवसाय करत आहेत. त्यामुळे रस्त्याचे काम करणार्‍या ठेकेदारास मोठ्या अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे. बर्‍याचवेळा रस्त्यावर पाणी टाकून रोलर फिरवताना वाहने बाजुला घेण्यासाठी व्यावसायिकांना सांगावे लागते. काही व्यावसायिक रस्त्याचे काम करणार्‍यांना जुमानत नसल्याने रस्त्याच्या कामाचा दर्जा राखला जाईल की नाही याबाबत शंका उपस्थित होत आहे.

वास्तविक पाहता या रस्त्याचे काम करताना बांधकाम विभाग व पाटबंधारे विभागाने अतिक्रमण हटाव मोहीम एकत्रीत राबवून संपूर्ण अतिक्रमण काढायला हवे होते. मात्र या दोन्ही विभागांनी हे अतिक्रमण गांभीर्याने घेतले नाही.

या रस्त्यालगतचे अतिक्रमण पूर्णपणे न हटविल्याने रस्त्याचे काम पूर्ण झाले तरी हे व्यावसायिक रस्त्यावरच वाहने उभी करून आपला व्यावसाय थाटणार असल्याने रस्त्याचे रुंदीकरण करूनही वाहतूक अडथळा कायम राहणार आहे. हे अतिक्रमण आताच काढले नाही तर भविष्यात वाहतूक वाढली तर याठिकाणी अपघाताच्या घटना घडू शकतात. दुर्दैवाने एखादी मोठी दुर्घटना घडली तर त्याची जबाबदारी अतिक्रमणाकडे दुर्लक्ष करणार्‍या सार्वजनिक बांधकाम विभाग व पाटबंधारे विभागावरच राहणार आहे.

तरी सार्वजनिक बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग व पोलीस प्रशासनाने भविष्यातील धोके लक्षात घेऊन आताच या रस्त्यालगतची सर्व अतिक्रमणे हटवावीत, तसेच सध्या रस्त्यावर वाहने उभी करून रस्ता कामात अडथळा निर्माण करणार्‍या अतिक्रमणधारक व्यावसयिकांवर कारवाई करावी,अशी मागणी प्रवासी वर्गाकडून होत आहे.

अतिक्रमणधारकांनी केली पाटचारी जमीनदोस्त

श्रीरामपूर-बेलापूर रस्त्याच्या पूर्व बाजूस पाटबंधारे विभागाची पाटचारी आहे. अतिक्रमणधारकांनी ही चारी जमीनदोस्त केली आहे. निळवंडे धरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर श्रीरामपूरकरांना पाटपाण्याची समस्या जाणवणार आहे. त्यामुळे सध्या बंद असलेल्या या पाटचारीचा वापर करावा लागणार आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाने आताच सार्वजनिक बांधकाम विभागासोबत अतिक्रमण हटाव मोहीम राबवून ही पाटचारी अतिक्रमणमुक्त करावी, अशी मागणी ऐनतपूर भागातील शेतकर्‍यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com