अतिक्रमित शिवरस्ते अखेर खुले

सप्तपदी योजने अंतर्गत पारनेर-श्रीगोंदा तहसीलदार यांची कारवाई
अतिक्रमित शिवरस्ते अखेर खुले

पारनेर (प्रतिनिधी) - पारनेर तालुक्यातील कडूस आणि श्रीगोंदा तालुक्यातील सारोळा सोमवंशी यादोन्ही गावाचा शिवरस्ता अतिक्रमित करुन अडविण्यात आला होता. हा रस्ता महसूल विभागाच्या सप्तपदी योजने अंतर्गत खुला करण्यात आला.

पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे व श्रीगोंदाचे तहसीलदार प्रदीप पवार, पारनेरचे गटविकास अधिकारी किशोर माने यांचे उपस्थितीत दोन्ही तहसीलदारांनी संयुक्त आदेश देऊन पारनेर व श्रीगोंदा या दोन्ही तालुक्यांचा 33 फुटाचा दीड किलोमीटर अंतराचा शिवरस्ता उपअधीक्षक भूमीअभिलेख यांनी दाखवलेल्या खून चिन्हा प्रमाणे खुला करून दिला. त्यामुळे अनेक वर्षांपासून असलेली परिसरातील शेतकरी वर्गाची मागणी मान्य झाली आहे.

पारनेर तालुक्यातील कडूस व श्रीगोंदा तालुक्यातील सारोळा येथील शिवरस्ता अतिक्रमण करून अडवला असल्याने सप्तपदी मोहिमेअंतर्गत पारनेरच्या तहसीलदार देवरे व श्रीगोंदा तहसीलदार पवार यांनी संबंधित रस्ता खुला करून दिला आहे. तालुक्यामध्ये वर्षानुवर्षे शिवरस्त्याचे प्रश्‍न प्रलंबित होते. मात्र सप्तपदी मोहिमेअंतर्गत अनेक रस्त्याचे प्रश्‍न मार्गी लावण्यात आले आहेत. तहसीलदार देवरे यांनी अनेक रस्ते शेतकर्‍यांना खुले करून दिले आहेत. त्याधर्तीवर तालुक्यातील कडूस व श्रीगोंदा शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले आहे. सदर रस्ता खुला करणे कामी दोन्ही तालुक्याचे उपअधीक्षक भूमी अभिलेख, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक तसे बेलवंडी पोलिस स्टेशन व सुपा पोलीस स्टेशन यांचा पोलीस बंदोबस्त हजर होता.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com