
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
करोनाचा परिणाम सर्वच क्षेत्रावर झालेला आहे. तसा तो रोजगार हमी योजनेवर ही झालेला आहे. कोविड काळानंतर जिल्ह्यात रोजगार हमीवरील मजुरांची संख्या 10 हजारांच्या पुढे गेलेली नाही. सध्या जिल्ह्यात रोहयोवर 8 हजार 817 मजुरांची उपस्थिती असून जिल्हा परिषद प्रशासनाने रोजगार हमीतून घरकुल बांधण्यास प्राधान्य दिले असून ग्रामीण भागातून शेतकर्यांकडून रोहयोतून गाय गोठ्यांच्या कामाची मोठी मागणी आहे.
महात्मा गांधी रोजगार हमी योजनेद्वारे ग्रामीण भागात गरजुंना 100 दिवसांचा हक्काचा रोजगार दिला जातो. त्यानुसार जिल्ह्यात रोहयोतून 2 हजार 89 कामे सुरू असून यात जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाची 1 हजार 671 तर महसूल यंत्रणेच्या 418 कामांचा समावेश आहे. सुरू असणार्या कामात घरकुलाची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. याशिवाय शोषखड्डे, रस्त्याची कामे, फळबागा कामे या कामांचा समावेश होता. जिल्ह्यात सध्या रोजगार हमी योजनेवर जिल्ह्यात सर्वाधिक मजूर हे कर्जत आणि जामखेड तालुक्यातील आहेत.
तर सर्वात कमी मजूर हे श्रीरामपूर तालुक्यात आहे. अलिकडे सरकारने रोजगार हमी योजनेतून जलसंधारणविषयक सिमेंट नाला बांध, दगडी नाला बांध, गॅबियन बंधारे, शोषखड्डे, सार्वजनिक शोषखड्डे, सलग समतल चर, पाझर तलाव दुरूस्ती, जमीन सपाटीकरण, गाळ काढणे, वनीकरण, रस्तादुतर्फा वृक्षारोपण, रोपवाटिका या पारंपरिक कामासोबत सिंचन विहीर, सार्वजनिक विहीर, शेततळे, फळबाग लागवड, रेशीम उत्पादन, बांधावरील वृक्ष, घरकूल, सामूहिक गोठे, मत्स्यपालन, शौचालय, रस्ता खडीकरण, मुरमीकरण, सिमेंट रस्ता, डांबर रस्ता, ग्रामसंघ इमारत, बाजार ओटा, स्मशानभूमी शेड, सार्वजनिक ठिकाणी सुशोभिकरण या कामाचा रोजगार हमी योजनेत समावेश केला आहे.
तालुकानिहाय मजुरांची उपस्थिती
अकोले 317, जामखेड 1 हजार 454, कर्जत 1 हजार 351, कोपरगाव 289, नगर 604, नेवासा 889, पारनेर 518, पाथर्डी 820, राहाता 330, राहुरी 298, संगमनेर 747, शेवगाव 735, श्रीगोंदा 311 आणि श्रीरामपूर 154 यांचा समावेश आहे.