
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
राज्यातील शासकीय कर्मचार्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी कालपासून आंदोलन पुकारलं आहे. एकच मिशन, जुनी पेन्शन या घोषणेसह राज्यभर काल विविध ठिकाणी शासकीय कर्मचार्यांनी आंदोलन केली दरम्यान, या संपात एकट्या नगर जिल्ह्यातून सुमारे 35 हजार शासकीय कर्मचार्यांचा समावेश असून यात सर्वाधिक संख्याही शिक्षकांची आहेत.
यात प्राथमिक, माध्यमिक आणि अकरावी, बारावीच्या शिक्षकांचा समावेश आहे. यासह महसूल, जिल्हा परिषद, आरोग्य, यासह अन्य शासकीय कर्मचारी देखील संपात सहभागी झाले आहे. राजपत्रित अधिकारी महासंघाने संपाला बाहेरून पाठींबा दिला आहे.
दरम्यान, जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारला सादर केलेल्या आकडेवारीत संपाच्या पहिल्या दिवशी नगर जिल्ह्यातून 47 शासकीय विभागातून 18 हजार 887 शासकीय आणि निमशासकीय कर्मचारी सहभागी झाल्याचे कळवले आहे. तर गट अफ 291, गट बचे 562, गट कचे 2 हजार 508 आणि गट डचे 602 शासकीय कर्मचारी संपात सहभागी न होता शासकीय कार्यालयात कामावर हजर असल्याचा दावा करण्यात आला आहे.
मंगळवारी जिल्ह्यातील शासकीय कर्मचार्यांनी संपात सहभाग नोंदवत काम बंद आंदोलन केले. यामुळे दिवसभर सर्वच शासकीय कार्यालय ओस पडली होती. यातील प्रमुख असणारे जिल्हाधिकारी कार्यालय, तालुका पातळीवर तहसील कार्यालय, जिल्हा परिषद, पंचायात समित्या, प्राथमिक, माध्यमिक शाळांसह 11 वी बारावीपर्यंतची उच्च माध्यमिक शाळा बंद ठेवण्यात आला. विविध शासकीय कर्मचार्यांनी नगरमध्ये मोर्चा काढून त्याचा समारोप जिल्हाधिकारी कार्यालयात केला. यावेळी सरकारच्या धोरणा विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येवून जुन्य पेन्शनसह अन्य मागण्या पूर्ण जोपर्यंत पूर्ण होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
या संपात 11 हजार 500 प्राथमिक शिक्षक, 10 हजार माध्यमिक शिक्षक, 1 हजार 500 अकरावी, बारावीचे शिक्षक, यासह जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कर्मचारी, महसूल, कृषी आणि आरोग्य कर्मचारी यांच्यासह अन्य शासकीय विभागातील 12 हजार असे संपात जिल्ह्यातून एकूण 35 हजार शासकीय कर्मचारी सहभागी झाले असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. दरम्यान, संपामुळे शासकीय आरोग्य सेवेवर पहिल्या दिवशी काहीसा परिणाम झाला असून नगर जिल्हा शासकीय रुग्णालयात कंत्राटी आरोग्य कर्मचारी यांच्या मार्फत आरोग्य सेवा पुरवण्यात आली. दरम्यान, संपात तोडगा न निघाल्यास शासकीय आरोग्य सेवेचा प्रश्न उभा राहणार असल्याची शक्यता जिल्हा रुग्णालयाच्यावतीने व्यक्त करण्यात आली.
दहावीचा गणित भाग 2 तयारी पूर्ण
जिल्ह्यात दहावी आणि बारावीची परीक्षा सुरू असून आज बुधवारी दहावीचा गणित भाग 2 हा महत्वाचा पेपर आहे. या पेपरची तयारी पूर्ण झाली असून जिल्ह्यात शासकीय कर्मचार्यांचा संप सुरू असला तरी त्याचा परिणाम या पेपर होणार नसल्याचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक समन्वय समितीच्यावतीने माध्यमिक शिक्षण विभागाला लेखी कळवण्यात आले आहे. विद्यार्थी आणि पालक हित समोर ठेवून आजचा पेपर सुरळीत होणार असून नेमणूक झालेले शिक्षक परीक्षा व्यवस्थतीत घेणार असल्याचे सांगण्यात आले.
संपातून माघारीच्या निर्णयाने जिल्ह्यात नाराजी
प्राथमिक शिक्षक संघटनेच्या एका गटाने काल संपातून माघार घेत असल्याची घोषणा केली. त्यावर नगरला सायंकाळी शिक्षक समन्वय समितीची तातडीने बैठक घेवून शिक्षक नेते संभाजीराव थोरात यांनी संपातून माघार घेतला असला तरी नगर जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संपात सहभागी राहणार असून कोणत्याही परिस्थितीत मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार नाही. शिक्षक नेते संभाजी थोरात यांच्या विश्वासघातकी भूमिका मान्य नसल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. बैठकीला दत्ता पाटील कुलट, संजय कळकर, प्रवीण ठुबे, गजनान जाधव, नारायण पिसे, शरद कोतकर, राजेंद्र निमसे, एकनाथ व्यव्हारे, विजय महामुनी, प्रवीण शेरकर, सुभाष तांबे, किरण दहातोंडे, सुदर्शन शिंदे, किरण दहातोंड यांच्यासह अन्य शिक्षक नेते उपस्थित होते.