संपकरी कर्मचार्‍यांवर दुसर्‍या दिवशीही कारवाई

संपात सहभागी कर्मचार्‍यांना जिल्हाधिकार्‍यांनी पाठविल्या नोटिसा
संपकरी कर्मचार्‍यांवर दुसर्‍या दिवशीही कारवाई

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जुनी पेन्शन योजनेसाठी पुकारलेल्या संपात सहभागी झालेल्या महसूल विभागातील कर्मचार्‍यांना जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी गुरूवारी (दिनांक 16 मार्च) नोटीसा जारी केल्या आहेत. विविध प्रलंबित मागण्यासाठी मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या राज्यव्यापी संपाचा गुरूवारी तिसरा दिवस होता.

महाराष्ट्र नागरी सेवा मधील तरतुदींचा भंग या संप आणि निदर्शनात सहभागी होऊन केल्याचे नमूद करीत आपल्या विरूध्द शिस्त विषयक कारवाई का करू नये, काम नाही, वेतन नाही, या धोरणाने संप कालावधीतील वेतन कपात का करू नये, अशी विचारणा या नोटिशीने करण्यात आली आहे. तसेच या नोटीसीचा खुलासा 24 तासात सादर न केल्यास महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1979 मधील तरतुदीनुसार कारवाई केली जाईल, असे देखील बजावण्यात आले आहे.

गुरूवारी दुपारनंतर महसूल विभागातील सर्व विभाग प्रमुख त्यांच्या अधिनस्त असलेल्या आणि संपात सहभागी झालेल्या सर्व कर्मचार्‍यांना या नोटिसा जारी करण्याचे काम युध्द पातळीवर कार्यरत असल्याचे आढळून आले. या कर्मचार्‍यांना या सर्व नोटिसा त्यांच्या मोबाईलवर पाठविण्याचे काम विभागप्रमुखांमार्फत सुरू होते.

जुनी पेन्शन योजना पूर्ववत सरकारी व निमसरकारी सरकारी कर्मचार्‍यांना लागू व्हावी, या प्रमुख मागणीसह प्रलंबित असलेल्या 18 मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्य सरकारी कर्मचारी संघटना व राज्य सरकारी मध्यवर्ती संघटना यांनी दिनांक 14 मार्च पासून बेमुदत संपाचे हत्यार उपसले आहे. मंगळवारपासून सुरू झालेला हा संप गुरूवारी तिसर्‍या दिवशी देखील सुरूच होता. या संपात जिल्ह्यातील प्रमुख शासकीय यंत्रणांचे जवळपास 18 हजार कर्मचारी सहभागी झाले आहेत. त्यामुळे प्रशासकीय कामकाज पूर्णतः ठप्प झाले. सलग तीन दिवस संपाची सहभागी कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम राहिले असतानाच संपाच्या तिसर्‍या दिवशी महसूल विभागातील कर्मचार्‍यांना जिल्हाधिकारी सालीमठ यांच्या सही शिक्कांनी नोटिसा दिल्या आहेत.

खुलासा आणि कारणे मागवणार्‍या नोटीसा विभाग प्रमुखांच्या मार्फत जारी करण्यात येऊ लागल्या आहे. जिल्हाधिकारी यांच्यामार्फत जारी झालेल्या या नोटीसी विचारना करण्यात आली आहे की, राज्य सरकारी कर्मचारी संघटना व राज्य सरकारी मध्यवर्ती संघटना यांनी राज्य सरकारी कर्मचार्‍यांच्या विविध प्रलंबित मागण्या संदर्भात 14 मार्चपासून पुकारलेल्या राज्यव्यापी बेमुदत संपात सहभागा संदर्भात सर्व कर्मचार्‍यांना महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1979 मधील नियम क्रमांक सहा नुसार शासकीय कर्मचार्‍यांनी कोणतेही निदर्शनामध्ये सहभागी होणे, ही बाब गैरवर्तणूक समजण्यात येऊन शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे दिनांक 13 मार्च रोजी कारणे दाखवा नोटीस अन्वये आपणास अवगत करण्यात आले होते.

तरीही आपण सदर राज्यव्यापी बेमुदत संपात सहभागी झालेला आहात. तरी आपण महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979 मधील तरतुदीचा भंग केल्याने आपल्याविरूध्द कारवाई का करू नये. तसेच शासनाचे ‘काम नाही, वेतन नाही’ या धोरणानुसार संप कालावधीतील वेतन कपाती बाबत कारवाई का करू नये, याबाबतचा 24 तासात आपला खुलासा सादर करावा. मुदतीत खुलासा प्राप्त न झाल्यास आपले काही एक म्हणणे नाही, असे समजून आपणाविरूध्द महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979 मधील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी, असे बजावण्यात आले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com