
राहाता |वार्ताहर| Rahata
राहाता नगरपरिषदेच्या कंत्राटी कर्मचार्यांना शासन नियमानुसार प्रत्येक महिन्याला वेळेवर किमान वेतन मिळावे, वेळेत पगार न देणार्या ठेकेदारांचा ठेका रद्द करावा, अशा विविध मागण्यांचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते मुन्ना सदाफळ यांच्या नेतृत्वाखाली कंत्राटी कामगारांनी खा. सुजय विखे पाटील यांना दिले.
निवेदनात म्हटले आहे, राहाता नगरपरिषदेत आरोग्य, विद्युत, पाणीपुरवठा व अग्निशामक विभागात जवळपास 60 कर्मचारी गेल्या अनेक वर्षापासून काम करत आहेत. यातील सर्व कर्मचार्यांना फक्त 230 रोजंदारी मिळते. तुटपुंजी रक्कम मिळत असूनही कुटुंबांची उपजीविका चालवण्याकरिता हे कर्मचारी वेळेची पर्वा न करता अहोरात्र मेहनत घेऊन काम करतात, असे असताना संबंधित ठेकेदार कंत्राटी कर्मचार्यांचे पगार वेळेवर करत नाही.
तीन महिने होऊनही कंत्राटी कर्मचार्यांचे पगार झाले नाहीत. सह्याद्री कन्स्ट्रक्शन नाशिक व सावित्रीमाई फुले सुशिक्षित बेरोजगार संस्था धुळे या ठेकेदारांनी आरोग्य व इतर विभागाचे टेंडर घेतले असून शासन नियमानुसार कंत्राटी कर्मचार्यांना 540 रुपये प्रतिदिन रोजंदारी देणे आवश्यक असताना कंत्राटी कर्मचार्यांना फक्त 230 रोजंदारी प्रतिदिन दिली जाते.
शासनाच्या इतर कर्मचार्यांप्रमाणे आठवडा व शासकीय सुट्टी दिली जात नाही. कंत्राटी कर्मचार्यांची पीएफ रक्कम वेळेवर जमा केली जात नसून आरोग्य विभागाच्या कंत्राटी कर्मचार्यांना मिळणारी पगाराची रक्कमही बँक खात्यात जमा केली जात नाही. आरोग्य विभागाच्या कर्मचार्यांना कचरा उचलण्याकरिता हातमोजे, मास्क, गमबूट, रेनकोट, ड्रेस दिले जात नाही. तसेच विद्युत, पाणीपुरवठा व अग्निशामक कर्मचार्यांना देखील ठेकेदारांकडून कुठलीही सुविधा दिली जात नसल्यामुळे सदर ठेकेदारांचा ठेका रद्द करून कंत्राटी कर्मचार्यांना नगरपालिकेकडे वर्ग करावे.
कामाचा ठेका देताना किमान वेतन दरपत्रात नमूद करावे. कर्मचार्यांचा विमा उतरविण्यात यावा, वेतन प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेच्या आत बँक खात्यात जमा करण्यात यावे व पी.एफ देखील बँक अकाउंटमध्ये जमा करावा. नवीन कामगार भरती करताना त्याचे वर्तन कसे आहे हे तपासूनच त्याला कामावर घ्यावे. अशा विविध मागण्यांचे निवेदन यावेळी कंत्राटी कर्मचार्यांनी खा.सुजय विखे पाटील यांना दिले आहे
या निवेदनावर अमोल आव्हाड, विनोद सोनवणे, गणेश जोगदंड, सिद्धांत थोरात, अक्षय ओहोळ, राजू रनशिवरे, अर्जुन घोडेराव, गणेश मकासरे, बबलू जोगदंड, सिद्धांत थोरात, अमोल बनसोडे, शेखर जोगदंड, कृष्णा कुराडे, अनिल थोरात, प्रवीण रणनवरे, पांडुरंग बनसोड, सागर कासार, प्रशांत त्रिभुवन, संदीप सदाफळ, दीपक आरणे, सचिन गाढवे, वैभव लहारे, अमोल बनकर, योगेश सुरासे आदी कंत्राटी कर्मचार्यांच्या स्वाक्षर्या आहेत.