एसटी कामगारांच्या संपामध्ये आता शेवगाव आगाराचे कर्मचारीही सहभागी

अनेक गाड्या रद्द, प्रवाशांचे हाल
एसटी कामगारांच्या संपामध्ये आता शेवगाव आगाराचे कर्मचारीही सहभागी

शेवगाव | शहर प्रतिनिधी

राज्य परिवहन महामंडळाचे महाराष्ट्र शासनात विलीनीकरण करण्यात यावे तसेच एस टी कर्मचा-यांना शासकीय कर्मचा-यांचा दर्जा, अधिकार व वेतन श्रेणी मिळावी या प्रमुख मागणीच्या पाठपुराव्यासाठी जिल्ह्यासह राज्यातील अनेक आगारातील कर्मचा-यांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरु केले आहे.

या आंदोलनात शेवगाव आगारातील कर्मचारी कामगार, सहभागी झाले असून आगारात रविवारी मध्यरात्री पासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारण्यात आले असून या आंदोलनामुळे दिवाळीच्या सुट्टीसाठी गावाकडे आलेल्या विविध विभागांचे कर्मचारी तसेच भाऊबिजेसाठी माहेरी आलेल्या महिलांसह प्रवाशांसमोर ऐन दिवाळीत विविध अडचणी उभ्या राहिल्याने एसटी कर्मचा-यांच्या या बेमुदत आंदोलनाची झळ सर्वच क्षेत्राला मोठ्या प्रमाणात सहन करावी लागत असून जो पर्यंत कामगार हिताचा निर्णय जाहीर होत नाही तो पर्यंत शेवगाव आगारातील कामगार कर्मचा-यांनी पुकारण्यात आलेले हे काम बंद आंदोलन नेटाने पुढे सुरु ठेवण्याचा निर्धार जाहीर केला आहे.

एसटी कर्मचा-यांच्या आंदोलनामुळे शेवगाव आगारातून सुटणा-या विविध १५० फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून शेवगाव आगारातून सोमवारी एकही बस निघाली नसल्याची माहिती आगार व्यवस्थापक वासुदेव देवराज यांनी दिली.

दिवाळीच्या काळात शेवगाव आगाराला गेल्या तीन दिवसात सरासरी सात ते आठ लाखांचे उत्पन्न मिळाले. मात्र कर्मचा-यांच्या संपामुळे आगाराच्या मोठ्या उत्पन्नाला फटका बसला असून कर्मचा-यांच्या या आंदोलनात आगारातील ९४ चालक , १०२ वाहक, ५१ यांत्रिकी विभागातील कर्मचारी तसेच १७ कार्यालयीन कर्मचा-यापैकी जवळपास सर्वच कर्मचारी सहभागी झाल्याची माहिती आगार व्यवस्थापक देवराज यांनी दिली.

एसटी कर्मचा-यांच्या या महत्वपूर्ण मागणीला शासनाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने शेवगाव आगारातील चालक दिलीप हरिभाऊ काकडे यांनी बलिदान दिले. कर्मचा-यांच्या मागण्यासाठी शहीद दिलीप काकडे यांचे बलिदान व्यर्थ जावू नये म्हणून आगारातील सर्व एसटी कर्मचा-यांनी आज दि.८ नोव्हेबर च्या प्रथम नियत पासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले असून जो पर्यंत एसटी महामंडळाच्या कर्मचा-यांचे शासनात विलीनीकरण होत नाही. तसेच कर्मचा-यांना शासकीय दर्जा मिळत नाही तो पर्यंत आगारातील सर्व कर्मचा-यांनी पुकारण्यात आलेले हे आंदोलन सुरु ठेवण्याचा निर्धार जाहीर केल्याची माहिती एसटी कामगार नेते दिलीप लबडे यांनी दिली.

कर्मचा-यांच्या या आंदोलनास शहर व तालुक्यातील विविध राजकीय पक्ष व संघटनांनी पाठींबा जाहीर केला असून या आंदोलनाची धग वाढत चालल्याचे व त्याचा फटका सर्व सामान्य प्रवाशांना सहन करावा लागत असल्याचे चित्र दिसून आले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com