गुगलवरील बनावट नंबरवर संपर्क केल्याने नोकरदाराची फसवणूक

खात्यातून गेले 1.87 लाख; कोतवाली पोलिसांत गुन्हा
गुगलवरील बनावट नंबरवर संपर्क केल्याने नोकरदाराची फसवणूक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

गुगलवरून झी- 5 अ‍ॅपचा घेतलेल्या हेल्पलाईन नंबरवर संपर्क केल्याने एका नोकरदाराला चांगलेच महागात पडले. समोरील व्यक्तीने सांगितल्याप्रमाणे त्यांनी प्रतिसाद दिला आणि बँक खात्यातून एक लाख 87 हजार रुपये काढून घेत फसवणूक केली आहे. जयंत गोविंद देशमुख (वय 55 रा. डॉक्टर कॉलनी, बुरूडगाव रोड) असे फसवणूक झालेल्या नोकरदाराचे नाव आहे. त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी अहमदनगर डिस्ट्रीक्ट सेंट्रल को. ऑप. बँक मुख्य कार्यालय अहमदनगर येथे नोकरीस आहेत. त्यांचे एसबीआय शाखा बुरूडगाव येथे सेव्हिंग खाते आहे. दिनांक 28 जानेवारी, 2023 रोजी त्यांनी मोबाईलमधून झी- 5 अ‍ॅपचे 699 रुपयांचे रिचार्ज केले परंतु झी-5 अ‍ॅप अ‍ॅक्टीव्ह झाले नव्हते. म्हणून दिनांक 14 फेब्रुवारी 2023 रोजी सायंकाळी फिर्यादी यांनी गुगलवरून झी-5 अ‍ॅपचा हेल्पलाईन नंबर शोधून त्यावर संपर्क केला. समोरील व्यक्तीने त्यांना फोनव्दारे तुमचे 699 रुपयांचे रिचार्ज दिसत असल्याचे सांगितले व तुमचे अ‍ॅप अ‍ॅक्टीव्ह नसल्यामुळे तुम्हाला एक रुपया फोन फे चा चार्ज भरावा लागेल, असे सांगितल्याने फिर्यादी यांनी त्याला फोन फे व्दारे एक रुपया पाठविला.

तसेच झी- 5 अ‍ॅप करिता एक दुसरे अ‍ॅप डाऊनलोड करायला सांगून त्यासाठी एक लिंक पाठविली. त्या लिंकव्दारे फिर्यादी यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये त्या व्यक्तीचे सांगणेप्रमाणे एक अ‍ॅप डाऊनलोड केले. त्या व्यक्तीने फोनव्दारे 36 तासांनंतर तुमचे झी-5 अ‍ॅप अ‍ॅक्टीव्ह होईल असे सांगितले. त्यानंतर दिनांक 18 फेब्रुवारी, 2023 रोजी फिर्यादी यांच्या बँक खात्यावरून एकूण एक लाख 87 हजार एक रुपये काढून घेतल्याचे त्यांना समजले.

परस्पर बँक खात्यातून पैसे काढून घेत फसवणूक केली असल्याचे लक्षात येताच देशमुख यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस अंमलदार शरद गायकवाड करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com