नेवासा (तालुका वार्ताहर) -

नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस पथकाने काल नेवासा पोलीस ठाण्यात छापा टाकून 10 हजार रुपयांची

लाच स्विकारताना एका पोलीस कर्मचार्याला रंगेहाथ पकडले असून या घटनेने खळबळ उडाली आहे. दरम्यान या घटनेबाबत नेवाशाच्या पोलीस अधिकारी व कर्मचार्यांकडून कोणालाही काही माहिती देण्यात आली नाही.

याबाबत माहिती अशी की, कन्नड (जि. औरंगाबाद) येथील एका ऊस तोड कामगाराच्या नातेवाईकाचा रस्ते अपघातात मृत्यू झाला होता. याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला होता. मयताच्या नातेवाईकाला मयताचा शवविच्छेदन अहवाल (पीएम रिपोर्ट) व पंचनाम्याची प्रत हवी होती. त्यामुळे तशी मागणी त्याने नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक सोमनाथ अशोक कुंढारे (वय 33) यांचेकडे केली होती.

शवविच्छेदन अहवाल व पंचनाम्याची प्रत देण्यासाठी पोलीस नाईक श्री. कुंढारे यांनी 16 मार्च रोजी तक्रारदार यांच्याकडे 15 हजार रुपये द्यावे लागतील असे सांगितले. अखेर तडजोड होवून दहा हजार रुपये देतो असे तक्रारदाराने मान्य केले.

दरम्यान नाशिक येथील लाचलुचपत विभाग कार्यालयाशी संपर्क साधून याबाबत माहिती देण्यात आली. लाचलुचपत विभागाचे पोलीस अधिक्षक सुनील कडासने यांच्या व अपर पोलीस अधिक्षक निलेश सोनवणे, पोलीस उपअधिक्षक विजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली 17 मार्च रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास लाचलुचपत विभागाचे पोलीस निरीक्षक उज्ज्वलकुमार पाटील यांनी नेवासा पोलीस ठाणे येथे येवून सापळा लावला. सापळा लावलेल्या पथकात हवालदार दीपक कुशारे, हवालदार सचिन गोसावी, पोलीस नाईक एकनाथ बावीस्कर, वाहन चालक पोलीस शिपाई श्री. जाधव यांचा समावेश होता.

ठरल्याप्रमाणे ऊस तोडणी मजुराकडून दहा हजार रुपयांची लाच स्विकारताना पथकाने पोलीस नाईक सोमनाथ कुंढारे यांना रंगेहाथ पकडले. त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधात्मक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीस निरीक्षक बैठकीत व्यस्त

सदर घटनेबाबत दाखल गुन्ह्याची माहिती देण्यास नेवासा पोलिसांकडून नेहमीप्रमाणे टाळाटाळ करण्यात आली व माहिती दिली नाही. पोलीस निरीक्षक विजय करे हे दुपारपासून रात्री उशिरापर्यंत आपण मिटींगमध्ये व्यस्त असल्याचे पत्रकारांना सांगत होते. ठाणे अंमलदार यांनाही कुणालाही माहिती द्यायची नाही असे बजावलेले असल्याने तेथूनही माहिती दिली गेली नाही. माहिती लपवण्याचा हेतू कोणालाच समजला नाही.