आणीबाणीतही पोलिसांनी ऑक्सिजन वाहने धरले अडवून

जनतेत असंतोष घटनेची चौकशीची मागणी
File Photo
File Photo

बोधेगाव |वार्ताहर| Bodhegav

करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे ऑक्सिजनची सर्वत्र मोठी आवश्यकता आहे. जिल्हा मोठ्या संकटात असतांना शेवगाव पोलिसांनी वेगळीच आगळीक केली आहे.

यामुळे लोकांच्या जीवावर बेतले असते. शेवगाव पोलीसांनी ऑक्सिजन टँकर त्यांनी दोन दिवस अडवून ठेवला. त्यांच्या या कार्यपद्धतीमुळे असंतोष निर्माण होत असून या प्रकारचा शेवगावात निषेध व्यक्त होत आहे. तसेच या प्रकरणाची चौकशीची मागणी होत आहे.

करोनाचे अत्यवस्थ रुग्णांसाठी आवश्यक असलेले ऑक्सिजन सिलेंडर रुग्णालयास पुरवण्यासाठी घेवून चाललेले वाहन खातरजमा न करता शेवगाव पोलीस ठाण्यात आणले. चौकशीच्या नावाखाली दोन दिवस तेथेच अडवून धरले. याबाबत खुद्द तहसीदारांनीच शहानिशा केल्यानंतर ते पुन्हा संबंधित श्री संत एकनाथ रुग्णालयास पाठवून देण्याची नामुष्की पोलिसांवर आली. संपूर्ण राज्यातच ऑक्सिजन सिलिंडरची गंभीर परिस्थिती असल्याने प्रशासनही सतर्क असतानाच सोमवार (दि.19) शेवगाव पोलीस ठाण्यातील एका जबाबदार पोलीस अधिकार्‍याने शहरातील श्री संत एकनाथ आयुर्वेद रुग्णालयास पोहच करण्यासाठी 22 ऑक्सीजन सिलिंडर घेवून निघालेले वाहन क्रमांक (एम.एच.15 सी.के 1569) खातरजमा न करता पोलीस ठाण्यात आणले.

विशेष म्हणजे त्याबाबतच्या मागणीचे रितसर पत्र आणि पावत्या संबंधिताकडे होत्या. त्या त्यांनी पोलीस ठाण्यात संबंधित अधिकार्‍यांना सादर करुनही चौकशीच्या नावाखाली ते अत्यंत महत्वाचे वाहन दोन दिवस पोलीस ठाण्यातच अडकवून ठेवले गेले. हा प्रकार रुग्णालय प्रशासनाने उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंढे व तहसीलदार अर्चना पागिरे यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी ते ऑक्सिजन सिलेंडर ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. रामेश्वर काटे यांच्याकडे सपूर्द केले. तहसीलदार यांनी संबंधित सिलिंडर खा. सुजय विखे यांच्या संस्थेच्या श्री संत एकनाथ रुग्णालयास देण्याचे पत्र संबंधित अधीक्षक व पोलीस ठाण्यास दिले. त्यानंतर दोन दिवसानंतर ते अत्यंत गरजेचे सिलेंडर रुग्णालय प्रशासनास मिळाले.

भाजप कडून चौकशीची मागणी

तालुक्यात करोना साथीचा फैलाव झाला आहे. परिस्थिती भयावह झाली असून करोना साथ रोखण्यासाठी सर्व विभागातील अधिकारी कर्मचारी जीव धोक्यात घालून सेवा देत आहेत. मात्र, शेवगाव पोलीस अधिकारी व कर्मचारी या काळात अत्यावश्यक सेवा देणार्‍या व्यवसायिक व संस्थांना प्रामुख्याने लक्ष करून कारवाईची भीती दाखवत आहेत. एकनाथ रुग्णालयाचे 22 ऑक्सिजन सिलेंडरचे वाहन अडवून खातर जमा न करता चौकशीच्या नावाखाली अत्यावश्यक वाहन पोलीस अधिकार्‍यांनी दोन दिवस पोलीस ठाण्यात अडकवून ठेवले. अत्यावश्यक परिस्थितीत रुग्णाच्या जीविताशी खेळण्याचा प्रयत्न केला आहे हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. यामुळे या प्रकरणातील दोषी पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, व्यापारी संघटनेचे गोपाळ धुत, उपनगराध्यक्ष वजीर पठाण यांनी जिल्हाधिकारी जिल्हा पोलिस अधीक्षक व राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com