यंदा 12 हजार 230 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र !
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत यंदा मागील वर्षीच्या तुलनेत नगर जिल्ह्यात इयत्ता पाचवीच्या निकालात किंचित घसरण, तर आठवीच्या निकालात सुधारणा झाली आहे. दरम्यान, पाचवी व आठवीचे एकूण 12 हजार 230 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले.
दरवर्षी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे पूर्व उच्च प्राथमिक (इ. 5 वी) व पूर्व माध्यमिक (इ. 8 वी) शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित केली जाते. स्पर्धा परीक्षेचा पाया म्हणून शिष्यवृत्ती परीक्षेकडे पाहिले जाते. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच शाळांतील मुलांनी ही परीक्षा द्यावी, यासाठी दरवर्षी शिक्षण विभागाकडून आवाहन केले जाते. यंदा ही परीक्षा 12 फेब्रुवारी 2023 रोजी घेण्यात आली होती. जिल्ह्यातून पाचवीसाठी 32 हजार 734, तर आठवीसाठी 22 हजार 52 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली.
त्याचा अंतरिम (तात्पुरता) निकाल 29 एप्रिल रोजी परिषदेच्या संकेतस्थळावर घोषित करण्यात आला. यात इयत्ता पाचवीचा निकाल 26 टक्के, तर आठवीचा निकाल 16.87 टक्के लागला. जो मागील वर्षी अनुक्रमे 27.29 टक्के व 13.23 टक्के होता. म्हणजे पाचवीच्या निकालात 1 टक्क्यांनी घसरण, तर आठवीच्या निकालात 3 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यात पाचवीचे 8 हजार 510, तर आठवीचे 3 हजार 720 असे एकूण 12 हजार 230 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले.
निकालाची वैशिष्ट्ये
पाचवीचा निकाल विभागात दुसरा, तर राज्यात नववा क्रमांक. 220 च्या पुढे गुण मिळवणारे 320 विद्यार्थी. आठवीच्या निकालात राज्यात 16 वा क्रमांक. आठवीच्या जि. प. शाळांच्या निकालात 4 टक्के वाढ.