अकरावी प्रवेशासाठी महाविद्यालय पातळीवरच ऑनलाईन पद्धत राबवावी

सत्यजित तांबे : शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना पाठविले पत्र
सत्यजित तांबे
सत्यजित तांबे

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

सीबीएससी व आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत राज्यातील एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांवर येणार्‍या काळात अकरावी प्रवेशावेळी अन्याय होऊ नये, अशी मागणी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली आहे.

यासाठी राज्य पातळीवर शैक्षणिक तज्ज्ञांची समिती गठित करून एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी तोडगा काढावा, या वर्षासाठी केंद्रीकृत ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया बंद करून महाविद्यालयीन पातळीवर ऑनलाईन पद्धती सुरू करावी, असा उपाय तांबे यांनी सुचविला आहे.

शिक्षणमंत्री गायकवाड यांना पाठविलेल्या पत्रात तांबे यांनी म्हटले, अतिरिक्त अंतर्गत गुणांकन पध्दतीमुळे आयसीएसई व सीबीएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना निकालामध्ये भरमसाट गुण मिळत असल्यामुळे गुणपत्रिकेच्या टक्केवारीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.

याचवर्षीचा जर सीबीएससी बोर्डाचा 12 वीचा निकाल पाहिलात तर प्रथम क्रमांक पटकवलेल्या 2 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले आहेत. दिल्ली बोर्डाची अंतर्गत गुणांकन पद्धती ही अतिरिक्त टक्केवारी वाढवणारी असून याबाबत शिक्षणतज्ज्ञांनी देखील अंतर्गत गुणांकन पद्धती बदलण्याची गरज व्यक्त केली आहे.

सीबीएससी बोर्डाने यावर्षी लॉकडाऊनमुळे राहिलेल्या लेखी परीक्षा रद्द करत विद्यार्थ्यांनी अंतर्गत गुणांकनामध्ये मिळवलेले मार्क हेच बोर्डाच्या निकालासाठी ग्राह्य धरले आहेत. शाळेचा निकाल चांगला लागण्यासाठी भारतीय शाळांची अंतर्गत गुणांकनात भरभरून मार्क देण्याची पद्धती आहे. याचा जादा फायदा सीबीएससीच्या विद्यार्थ्यांना मिळत आहे.

याउलट एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत गुणांकन फक्त 20 टक्केच असल्याने त्यांचे गुणपत्रिकेत गुण कमी भरतात. परिणामी एसएससीच्या विद्यार्थ्यांवर बोर्डाच्या परीक्षेस सामोरे जाऊनही अकरावीच्या महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेत सरळसरळ अन्याय होणार आहे.

सीबीएससी व आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांना 40 टक्के अंतर्गत गुणांकन असल्याने दरवर्षी झुकते माप मिळतच असते, परंतु यावर्षी मात्र फारच मोठ्या प्रमाणात झुकते माप मिळणार आहे, असल्याचे तांबे यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

एसएससीच्या विद्यार्थ्यांवर अकरावीच्या महाविद्यालयीन प्रवेशाप्रक्रियेत अन्याय होऊ नये, यासाठी प्रत्येक महाविद्यालयात एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी जास्तीतजास्त जागा राखीव ठेवाव्यात. यामुळे सीबीएससी व आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांसोबत असमतोल स्पर्धा होणार नाही. बोर्डाची परीक्षा देऊनही जर एसएससीच्या विद्यार्थ्यांना नाहक 11 वीच्या प्रवेश प्रक्रियेत अन्याय सहन करावा लागला तर ते विद्यार्थ्यांच्या दृष्टीने दुर्दैव असेल, असे मत प्रदेशाध्यक्ष तांबे यांंनी नोंदविले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com