संग्रहीत फोटा
संग्रहीत फोटा
सार्वमत

अकरावी प्रवेश यंदा नो टेन्शन..!

Arvind Arkhade

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर झाला. यात 96.10 टक्क्यांच्या सरासरीने 65 हजार 360 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

दरम्यान जिल्ह्यात अकरावीसाठी अनुदानीत, विना अनुदानीत आणि स्वयंसिध्द अकरावीच्या 940 तुकड्यांमध्ये 76 हजार 660 जागा आहेत. यामुळे यंदा जिल्ह्यात अकरावी प्रवेशासाठी गर्दी होणार नसून पालक आणि विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाचे टेन्शनच राहणार नाही.

दोन दिवसांपूर्वी दहावीचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला. यात नगर जिल्ह्यातून दहावीसाठी एकूण 69 हजार 53 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यातील 65 हजार 360विद्यार्थी उत्तीर्ण झाले. नगर जिल्ह्याचा निकाल 96.10 टक्के लागला. गेल्या वर्षीच्या तुलनेत सतरा टक्क्यांनी निकाल वाढला. म्हणजे यंदा जादा विद्यार्थी उत्तीर्ण झाले. दरम्यान, शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशाची तयारी सुरू केली आहे.

त्या पार्श्वभूमीवर यंदा जिल्ह्यासाठी कला, विज्ञान, वाणिज्य व संयुक्त अशा शाखांसाठी तब्बल 76 हजार 760 जागा उपलब्ध आहेत. जिल्ह्यात 440 कनिष्ठ महाविद्यालये असून त्यात 453 अनुदानित, 295 विनाअनुदानित, 192 स्वयं अर्थसहित अशा एकूण 940 तुकड्या आहेत. या सर्व तुकड्यांची क्षमता यंदा 76 हजार 550 विद्यार्थ्यांची आहे.

विज्ञान शाखेत प्रवेश वाढणार

नेहमीप्रमाणे अकरावीसाठी विज्ञान शाखेत प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल असतो. मागील वर्षी एकूण विद्यार्थ्यांच्या 54 टक्के विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेला पसंती दिली होती. यंदाही 50 टक्क्यांच्या पुढे प्रवेश विज्ञान शाखेत होण्याची शक्यता आहे. दहावीत सुमारे 66 हजार विद्यार्थी उत्तीर्ण असून त्यातील 50 टक्के म्हणजे 33 हजार विद्यार्थ्यांनी जरी विज्ञान शाखा निवडली तरी प्रवेश होणार आहेत. परंतु विज्ञान शाखेकडे कल असल्याने कला शाखेतील अनेक जागा रिक्त राहतात. त्यामुळे कला शाखांना प्रवेशासाठी कसरत करावी लागते. यंदाही तीच स्थिती असण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात शाखानिहाय आणि मंजूर तुकड्यानिहाय 76 हजार 660 जागा आहेत. यात 34 हजार (44.35 टक्के) जागा विज्ञान शाखेसाठी उपलब्ध आहेत. तर कला शाखेसाठी 29 हजार 600 जागा असून 10 हजार 970 जागा वाणिज्य शाखेसाठी, तर 2 हजार 120 जागा संयुक्त शाखेसाठी आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com