एकरकमी वीज बील भरल्यास 2 टक्के सूट
सार्वमत

एकरकमी वीज बील भरल्यास 2 टक्के सूट

आर्थिक परिस्थिती बिकट असल्यास तीन टप्प्यांत बील भरण्याची सवलत

Arvind Arkhade

श्रीरामपूर|प्रतिनिधी|Shrirampur

वीज बिलाबाबत शंका निरसन करून एकत्रितरित्या वीज बिल भरल्यास वीज बिलामध्ये 2% डिस्काउंट अथवा ज्या ग्राहकांची आर्थिक परिस्थिती बिकट असेल, त्यांना तीन टप्प्यांमध्ये वीज बिल भरण्याची सुविधा वीज वितरणने उपलब्ध करून दिली असल्याची माहिती श्रीरामपूर उपविभागाचे प्रभारी उपकार्यकारी अभियंता निलेश नागरे यांनी दिली. ग्राहकांमध्ये वीज बील भरण्याबाबत जनजागृती करण्यात आली.

लॉकडाऊन कालावधीनंतर एकत्रितरित्या आलेल्या वीज बिलामुळे ग्राहकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झालेली होती. या पार्श्वभूमीवर ग्राहकांचे वीज बिलांबाबत शंकानिरसन करण्यासाठी महावितरण श्रीरामपूर उपविभागाच्यावतीने ऑनलाईन पद्धतीने वेबिनार (गुगल मीट) व विविध मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले होते.

वेबिनार पद्धतीने गुगलमीटद्वारे विभागीय कार्यालय श्रीरामपूर येथील प्रवीण गटकळ, उपव्यवस्थापक (वित्त व लेखा), उपविभागातील सर्व बिलिंग स्टाफ सर्व अभियंते, जनमित्र, आऊटसोर्समधील कर्मचारी हे सातत्याने ग्राहकांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करून त्यांचे वीज बिलाबाबत शंका निरसन केले.

सदरील मोहीम ही प्रभारी मुख्य अभियंता श्री. खंदारे, अधीक्षक अभियंता संतोष सांगळे, प्रभारी कार्यकारी अभियंता श्री. क्षीरसागर यांचे मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर उपविभागाचे प्रभारी उपकार्यकारी अभियंता निलेश नागरे व त्यांची उपविभागाची संपूर्ण टीम हे मोठ्या प्रमाणात राबवत आहेत व ग्राहकांचा याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

ज्या ग्राहकांना वीज बिलांबाबत शंका असेल त्यांनी तात्काळ जनमित्र, शाखा अभियंता अथवा उपविभागीय कार्यालय येथील बिलिंगमधील कर्मचारी यांचे सोबत संपर्क करून तात्काळ वीज बिलांबाबत शंका निरसन करून तत्काळ वीज बिल भरावे, असे आवाहन निलेश नागरे यांनी केले.

Deshdoot
www.deshdoot.com