
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
वीज मिटरमध्ये छेडछाड करून वीज चोरी करणार्या तिघांविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या भरारी पथकाचे कार्यकारी अभियंता हरीचंद्र भास्कर पोपळघट (वय 48) यांनी फिर्याद दिली आहे.
पाईपलाइन रस्त्यावरील वीज ग्राहक प्रिया सुभाष गुंदेचा, वीज वापरदार ग्राहक विवेक सुरेश मुनोत तसेच वीज ग्राहक जमीर गुलाब शेख अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. भरारी पथकाचे अतिरिक्त अभियंता पोपळघट यांच्यासह पथकातील सहाय्यक अभियंता गफ्फार शेख, कनिष्ठ अभियंता आशिष नावकार, वरिष्ठ तंत्रज्ञ अमोल गारूडकर यांनी 13 जुलै 2023 रोजी वीज ग्राहक गुंदेचा यांच्या वीज मिटरची तपासणी केली असता तेथे ग्राहक मुनोत उपस्थित होते.
मिटरमध्ये छेडछाड करून 24 महिन्यांत एक लाख 11 हजार 834 रुपये किंमतीची पाच हजार 421 युनिटची वीज चोरी केल्याचे पथकाच्या लक्षात आले म्हणून गुंदेचा व मुनोत यांच्या विरोधात सोमवारी (दि. 4 सप्टेंबर) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दुसरा छापा जमीर गुलाब शेख याच्या कार्यालयावर टाकला. तेथील वीज मिटरची पथकाने तपासणी केली असता त्यामध्ये छेडछाड केल्याचे निदर्शनास आले. शेख विरोधात वीज चोरी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.