ऊर्जा मंत्री साहेब, वीज बिल भरतो पण...

ऊर्जा मंत्री साहेब, वीज बिल भरतो पण...

लोणी |वार्ताहर| Loni

राहाता तालुक्यातील प्रवरा परिसरातील शेतकर्‍यांनी थेट ऊर्जा मंत्र्यांकडे काही मागण्या करताना शेतीचे वीजग्राहक म्हणून थकीत

वीज बिल भरण्याची ग्वाही दिली आहे, मात्र त्यासाठी काही अटी घातल्या असून त्याची अगोदर पूर्तता करण्याची विनंती केली आहे.

सध्या राज्यात सर्वत्र महावितरणने थकीत वीज बिल वसुलीसाठी शेती पंपांचा वीज पुरवठा खंडित करण्याचा धडाका लावला आहे. या पार्श्वभूमीवर प्रवरा परिसरातील अनेक गावांतील शेतकर्‍यांनी एकत्र येत थेट ऊर्जा मंत्र्यांना आम्ही थकीत वीज बिलं भरण्यास तयार असल्याचे सांगताना त्यापूर्वी आमच्या काही मागण्या आहेत त्यांची सोडवणूक करण्याचा आग्रह धरला आहे.

शेतकर्‍यांची मुलं म्हणून आम्ही तुम्हाला निवडून यासाठी दिले की, तुम्हाला शेतकर्‍यांच्या अडचणीची माहिती आहे. निवडणुकीच्यावेळी तुम्ही शेतकर्‍याला जणू आता सुखाचे दिवस आणणार अशी आश्वासने देता. सत्तेत गेल्यावर तुमच्यातील शेतकरी जातो कुठे? असा सवाल करीत हे शेतकरी म्हणाले, एक आठवडा दिवसा आणि एक आठवडा रात्रीची वीज देऊन तुम्ही शेतकर्‍यांची थट्टा चालवली आहे.

दिवसाची वीज फक्त नावापुरती असते ती दोन तासही मिळत नाही हे तुम्हाला माहित नाही का? खरीप, रब्बी आणि चारा पिके यांना रात्रीचे पाणी देता येते का? हे तुम्हाला शेतकरी असून माहित कसे नाही.

ट्रान्सफॉर्मर खराब झाला तर तो शेतकर्‍यांनी पैसे जमा करून आणायचा, अधिकार्‍यांची विनवणी करायची. मग महावितरण नेमके करते तरी काय? तुमचा वायरमन नक्की करतो काय हे एकदा लोकांना विचारून जाणून घ्या. वाकलेले खांब आणि लोंबकळणार्‍या तारा दरवर्षी किती एकर ऊस जाळतात याची माहिती तुम्ही घ्या. महावितरण याची नुकसान भरपाई सुद्धा देत नाही. पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात लाखो शेतकर्‍यांचे वीज पंप बंद असताना त्यांना वीज बिल कशासाठी आकारले जाते? असे प्रश्न शेतकर्‍यांनी उपस्थित केले.

अनेक वर्षांपासून महावितरणने शेतीची वीज बिलेच दिलेली नाहीत. आधी बिलं द्यायला तरी सांगा. आम्हाला दिवसा आठ तासच पण पूर्ण दाबाने अखंड वीज द्या. पोल आणि तारा दुरुस्त करा. विजेच्या शॉर्ट सर्किटने होणार्‍या नुकसानीची योग्य भरपाई देण्याची तरतूद करा. देशातील किती राज्यांत शेतीला मोफत वीज दिली जाते व ते त्या राज्याला कसे परवडते हे समजून घ्या आणि राज्यात तसा निर्णय घ्या.

लाखो शेतकर्‍यांनी राज्यात ज्या आत्महत्या केल्या आहेत त्यामागे विजेचा खेळखंडोबा हे सुद्धा महत्त्वाचे कारण आहे हे समजून घ्या. तुमची पै ना पै आम्ही भरतो पण आधी आमचे हे म्हणणे समजून घ्या आणि त्याची अंमलबजावणी करा. या देशात फक्त शेतकरीच प्रामाणिक आहे. करोनाच्या महामारीत सगळे घरात होते फक्त तोच शेतात राबून सर्वांचे पोट भरीत होता याचा विसर एवढ्या लवकर पडावा याचे आश्चर्य वाटते, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

लोणी बुद्रुक, खुर्द, गोगलगाव, सादतपूर, औरंगपूर, हसनापूर, पाथरे, दुर्गापूर, दाढ, हनुमंतगाव, लोहगाव, बाभळेश्वर, चंद्रापूर, आश्वी, चनेगाव, धानोरे, सात्रळ, सोनगाव, कोल्हार आदी गावांतील शेकडो शेतकर्‍यांनी या भावना व्यक्त केल्या आहेत. ऊर्जा राज्यमंत्री जिल्ह्यातील असल्याने ते तरी शेतकर्‍यांचे दुःख समजून घेतील, अशी अपेक्षा आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com