अवाजवी वीजबिले कमी करा
सार्वमत

अवाजवी वीजबिले कमी करा

शिर्डी राष्ट्रवादीचे ऊर्जामंत्री प्राजक्त तनपुरे यांना साकडे

Arvind Arkhade

शिर्डी|शहर प्रतिनिधी|Shirdi

शिर्डी शहरातील रहिवासी भागातील नागरिकांचे महावितरण कंपनीने रीडिंग न घेताच ग्राहकांना नेहमीपेक्षा दुप्पट व चारपट जादा वीजबिल आकारले असून या वीज बिलाचा चांगलाच झटका ग्राहकांना बसला आहे.

सदरचे अवास्तव वीज बिले कमी करून हप्त्याने भरण्याची सुविधा मिळावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष रमेश गोंदकर यांनी केली असून ऊर्जा मंत्री प्राजक्त तनपुरे यांना साकडे घातले.

शिर्डी शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ना. तनपुरे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, करोना संसर्गामुळे साडेचार महिन्यांपासून लॉकडाऊन असल्याने शिर्डी शहरातील लहान-मोठे व्यावसायिक व्यापारी, दुकाने, शहरातील हॉटेल लॉज, उपाहारगृहे पूर्णतः बंद आहेत. बंद असलेल्या व्यवसायांचे अवास्तव बिल ग्राहकांच्या माथी मारण्यात आले आहे. सर्वसामान्य तर सोडाच पण मोठमोठ्या व्यावसायिकांनाही वीज बिले भरणे शक्य नाही.

वहन आकार म्हणून 1 रुपये 18 पैसे नवीन बिलात समाविष्ट करण्यात आले आहे. करोनाच्या साथीमुळे सर्वत्र लॉकडाऊन सुरू आहे. इतर ठिकाणांप्रमाणेच शिर्डीतील व्यवहार कडेकोट बंद असून सर्वसामान्य माणूस घरात बसून आहे. त्याची अवस्था अतिशय हलाखीची झाली आहे. त्यामुळे हा प्रश्न सामान्य माणसाला भेडसावत असताना सरासरीने काढलेली वीजबिल पाहून त्यांची अवस्था बिकट झाली आहे.

अवास्तव वाढीव बिलांची रक्कम कमी करावी तसेच सदर बिले भरण्यासाठी मुदतवाढ मिळावी, वीजबिलाचे हप्ते पाडून भरण्याची सवलत देण्यात यावी, अशी मागणी ना. तनपुरे यांच्याकडे करण्यात आली.

तसेच नादुरुस्त वीजमीटर व जलदगतीने चालणारे वीजमीटर याबाबत ग्राहकांच्या अनेक तक्रारी असून त्याची दखल घेण्यासाठी अधिकार्‍यांना सूचना कराव्यात, अशी मागणीही ऊर्जामंत्री तनपुरे यांच्याकडे करण्यात आली आहे.

या निवेदनावर राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष रमेश गोंदकर, जिल्हा सचिव सुधाकर शिंदे, शहराध्यक्ष महेंद्र शेळके, निलेश कोते, शिवाजीराव कोते, संदीप सोनवणे, अमित शेळके, दीपक गोंदकर, चंद्रकांत गोंदकर, प्रकाश गोंदकर, अभिषेक शेळके, साई कोतकर, गणेश गोंदकर, शायद सैय्यद, निलेश जाधव, किरण माळी, समीर शेख, राहुल फुंदे, प्रसाद पाटील, सईद शेख, अमोल बाणाईत आदींची नावे आहे.

Deshdoot
www.deshdoot.com