‘क्विक सपोर्ट’ अ‍ॅप डाऊनलोड केले अन् पाच लाखांना चुना

वीज बिल अपडेट करण्याच्या नावाखाली शेतकर्‍याची फसवणूक
Fraud (फसवणुक)
Fraud (फसवणुक)

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

वीज बिल सिस्टीममध्ये अपडेट झालेले नाही, ते अपडेट करून घ्यायचे आहे, असे सांगून मोबाईलमध्ये ‘क्विक सपोर्ट’ अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यास सांगून शेतकर्‍याच्या खात्यातून पाच लाख 24 हजार रुपये काढून घेतल्याची घटना समोर आली आहे.

भारत नारायण काकडे (वय 59 रा. बोर्ले ता. जामखेड) असे फसवणूक झालेल्या शेतकर्‍याचे नाव असून सदरची घटना 2 जून 2023 ते 12 जून 2023 दरम्यान घडली असून याप्रकरणी 29 सप्टेंबर 2023 रोजी येथील सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारत काकडे यांना एका मोबाईल नंबरवरून फोन आला. फोन करणार्‍याने वीज बिल सिस्टीममध्ये अपडेट झालेले नाही ते अपडेट करून घेण्यास सांगितले. त्यासाठी त्याने काकडे यांना ‘क्विक सपोर्ट’ नावाचे अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यास सांगितले.

काकडे यांनी अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड करताच त्यांच्या मोबाईलचे अ‍ॅक्सेस त्या व्यक्तीकडे गेले. काकडे यांना याचा काहीही संशय आला नाही. फोन करणार्‍या व्यक्तीने मोबाईल अ‍ॅक्सेस येताच काकडे यांच्या आयसीआयसी बँक खात्यातून पाच लाख 24 हजार रुपये रक्कम काढून घेतली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर काकडे यांनी संबंधित मोबाईल नंबर धारक व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक संजय सोनवणे करीत आहेत.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com