पिंपरी निर्मळ |वार्ताहर| Pimpari Nirmal

महावितरण कंपनीने थकीत शेती विज बिलाच्या वसुलीसाठी आता विज रोहीत्र बंद करण्याचा सपाटा सुरू केला आहे.

वीज पुरवठा बंद झाल्याने हातातोंडाशी असलेली व केवळ एका पाण्यावर आलेली रब्बीची पिके वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. दुष्काळामुळे गेल्या अनेक वर्षापासून बंद असलेल्या विज मोटारी चांगल्या पावसामुळे चालू वर्षीच ढळल्या आहेत. महावितरणच्या पठाणी वसुलीमुळे शेतकरी संकटात आला असून महावितरणने वसुलीच्या नावाखाली वीज रोहीत्र बंद करू नये, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

महावितरण कंपनीने शेतकर्यांकडील थकीत शेतीबिल वसुलीसाठी महावितरण कृषी योजना 2020 आणली आहे. यामध्ये थकीत शेतीविज बिल भरल्यास विज बिलात 50 टक्क्यापर्यंत सूट देण्यात येणार आहे. मात्र गेल्या कित्येक वर्षापासून निळवंडे लाभक्षेत्रातील जिरायती परिसराला पावसाआभावी दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे.

त्यामुळे पावसाअभावी गेल्या अनेक वर्षात या जिरायती भागात विज मोटारीच ढळल्या नव्हत्या. चालू वर्षी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे जिरायती भागातील पाणी पातळी वाढल्याने प्रथमच रब्बीचे गहू, मका, ज्वारी, हरभरा आदी पिके घेण्यात आली. पिके शेवटच्या टप्प्यात व शेवटच्या पाण्यावर आलेली असताना महावितरण कंपनीने थकीत शेती बिले वसुलीसाठी वीज रोहीत्र बंद करण्याचे धोरण घेतले आहे.

मात्र यामुळे शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची शक्यता आहे. पिके निघाल्यानंतर वसूल केल्यास शेतकर्यांना विज देयके भरण्यासाठी किमान पिकांचे तरी उत्पन्न मिळणार आहे. मात्र विजेअभावी पिकेच जळून गेली तर पिकेही वाया जाणार असून शेतकर्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीने वसुलीसाठी वीज रोहीत्र बंद करू नये, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

चित्रपटातील अभिनेते व मॉडेल यांच्या मृत्यूवर राज्यभरात सरकारच्या विरोधात रान उठविणारे विरोधी पक्षाचे नेते मात्र शेतकर्यांचा वीज पुरवठा खंडित होत असताना मूग गिळून बसलेले आहेत. यामुळे विरोधी पक्षाच्या भूमिकेबाबत शेतकर्यांमधून संताप व्यक्त होत आहे.

शरद पवारांचा तो व्हीडीओ व्हायरल

राज्यात युती सरकार असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा 2017 मधील शेतकरी अडचणीत आहे. वीज बिल भरू नका, असे भाषण असलेला व्हीडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून विरोधात असताना एक व सत्तेत आल्यानंतर वेगळे धोरण पुढारी कसे घेतात याची चर्चा सोशल मीडियावर मोठया प्रमाणात होत आहे.