वीजबिल वसुलीचे परिपत्रक मागे घ्यावे- आ. विखे

वीजबिल वसुलीचे परिपत्रक मागे घ्यावे- आ. विखे
आ. राधाकृष्ण विखे पाटील

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

शेतकर्‍यांकडील वीज देयके साखर कारखान्यांनी वसूल करण्यासंबंधीचे पत्रक काढण्याचा कोणताही अधिकार साखर आयुक्त कार्यालयाला नाही.त्यामुळे शेतकर्‍यांची वीजबील वसुली करण्यासंबंधीचे परीपत्रक तातडीने मागे घ्यावे, अशी मागणी भाजप नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

संगमनेर येथे माध्यमांशी बोलतांना आमदार विखे म्हणाले, मुळातच शेतकर्‍याचे संपूर्ण वीज बील माफ करावे ही आमची मागणी आहे. परंतु राज्य सरकारला शेतकर्‍याच्या प्रश्नांचे कोणतेही देणेघेणे नाही. महाविकास आघाडी सरकार फक्त घोषणा करते परंतु कोणतीही अंमलबजावणी करीत नाही.

वाढीव वीज बिल देऊन राज्यातील शेतकर्‍यांना सरकारने अर्थिक संकटात टाकले असल्याचा आरोप करून आ. विखे म्हणाले की, कोव्हीड संकट आणि नंतर राज्यात आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी पूर्णतः उद्ध्वस्त झाला आहे. शेतकर्‍यांच्या उत्पादीत मालाला भाव मिळू शकला नाही. राज्य सरकारची कोणतीही मदत शेतकर्‍यांना पोहचू शकलेली नाही अशा परिस्थितीत वीज बिलाची वसुली करून सरकार ऐन दिवाळीत शेतकर्‍यांची दिवाळी अंधारात घालणार का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

वीज वसुलीच्या साखर आयुक्त कार्यालयाने कारखान्यांना दिलेले पत्र हे आश्चर्यकारक आहे. मुळातच असे पत्रक काढण्याचा कोणताही अधिकार या कार्यालयाला नाही. त्यामुळे सरकारने हे पत्रक तातडीने मागे घ्यावे. कोणत्याही कारखान्याने शेतकर्‍यांकडून वीज बिलाची वसुली करू नये अन्यथा शेतकरी आंदोलन करून सरकारलाच धारेवर धरतील, असा इशारा आ. विखे पाटील यांनी दिला. याबाबत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून हे पत्रक मागे घेण्याची आपण मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com