आकडे टाकणार्‍यांच्या विजेची अधिकृत जोडधारकांकडून केली जातेय बिल वसुली

ग्राहकांत संताप
आकडे टाकणार्‍यांच्या विजेची अधिकृत जोडधारकांकडून केली जातेय बिल वसुली

नेवासाफाटा |वार्ताहर| Newasa Phata

नेवासा तालुक्यात वीजचोरचे मोठे प्रमाण असून सरासरी बिलाच्या माध्यमातून अधिकृत वीजजोड असलेल्यांकडूनच वीज चोरी करणार्‍यांच्या बिलाची रक्कम वसूल केली जात असल्याचे कटूसत्य समोर येत आहे. त्यामुळे अधिकृत वीजजोड असलेल्या ग्राहकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

संपूर्ण जगात विजेची टंचाई लक्षात घेता ग्राहकांवर पडणारा अतिरिक्त आणि वाढीव बिलाचा भार दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यातच आता कोळशाच्या टंचाईमुळे चंद्रपूर येथील औष्णिक वीजनिर्मिती केंद्र पुरेशा प्रमाणात वीजनिर्मिती करू शकणार नाही. त्यामुळे सध्या तरी संपूर्ण महाराष्ट्रावर विजेचे फार मोठे संकट ओढावले आहे. केंद्रीय ऊर्जा मंत्र्यांनी देखील याला दुजोरा दिला आहे.

अनेक खेडेगावांमध्ये आजही मोठ्या प्रमाणात विजचोरी होते. नेवासा तालुक्यामध्ये जेवढी छोटी गावे आहेत त्या प्रत्येक गावामध्ये मोठ्या प्रमाणात लोक गेल्या कित्येक वर्षांपासून आकडा टाकून विजेची चोरी करताना आढळून येतात. वीज कर्मचारी, अधिकारी यांच्या निदर्शनास ही गोष्ट येत असली तरी कुठलीच कारवाई होताना दिसत नाही. कित्येक हजार युनिट वीज ही आकडा टाकून वापरली जाते. काही गावांमध्ये अधिकृत मीटर मोजक्या व तुरळक लोकांकडे आहे.

बाकी सर्व कित्येक वर्षांपासून आकडा टाकून वीज चोरी करताना दिसतात. ही गोष्ट अधिकृत मीटर धारकांच्या समजण्यापलीकडची आहे. नुकतंच वीज वितरण कंपनीने बिल भरले नाही म्हणून अनेक मीटर धारकांचे वीज कनेक्शन कट केले गेले पण आकडा धारकांवर मात्र कुणाची मेहेरनजर आहे या प्रश्नाचे उत्तर वीज वितरण कंपनीकडून येणे बाकी आहे.

अधिकृत ग्राहक संघर्षाच्या मनःस्थितीत

महावितरणचे अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी लवकरात लवकर आकडा टाकणार्‍यांवर, वीजचोरी करणार्‍यांवर कारवाई करावी अन्यथा भविष्यात या गोष्टींमुळे वीज वितरण कंपनीविरुद्ध अधिकृत मिटरधारक असा संघर्ष पेटल्यास नवल वाटू नये.

वीजचोरी करणार्‍यांना कोणते अधिकारी आणि कर्मचार्‍यांचा वरदहस्त आहे याचा तपास अभियंत्यांनी करून लवकरात लवकर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी.

- गणेश झगरे प्रदेशाध्यक्ष, मराठा सुकाणू समिती

Related Stories

No stories found.