श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

वीजवितरण कंपनीकडून सगळीकडेच सक्तीने वीज बील वसुलीची मोहीम राबविली जात आहे. जशी वसुली केली जाते त्याप्रमाणात ग्राहकांना सेवा देण्यास वीज वितरण अपयशी ठरली आहे.

श्रीरामपुरात वीज बिल भरण्यास ग्राहक तयार आहेत मात्र त्यांंना गेल्या सहा महिन्यांपासून नवीन वीज कनेक्शनधारकांंना नवीन मिटरच मिळत नसल्यामुळे ग्राहक संतप्त झाला आहे. खासगी दुकानातून मिटर आणण्याचा आग्रह धरला जात असल्यामुळे अनेकांनी अशा वीज वितरणच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

सध्या वीज बिल वसुलीची मोहीम मोठ्या प्रमाणावर राबविली जात आहे. जे थकबाकीदार आहेत त्यांचे वीज कनेक्शन तोडले जात आहे. काही ग्राहक वीज बिल भरण्यास तयार आहेत अशा ग्राहकांचे भरमसाठ आलेले वीज बिल भरण्यासाठी हप्ते करून देण्याची मागणी केली जात आहे.

मात्र अधिकार्यांकडून अशा ग्राहकांना व्यवस्थित वागणूक दिली जात नाही. त्यामुळे वीज बिल थकीत झाली आहेत. वीज बिल भरण्यास तयार असलेल्या ग्राहकांंना बिघडलेले मिटर बदलून दिले जात नाही. या अधिकार्याकडून त्या अधिकार्याकडे नुसत्या चकरा मारण्याचा त्रास दिला जात आहे.

नवीन वीज कनेक्शनधारकांना मिटरच दिले जात नाही. वीज वितरण कंपनीकडे मिटरच शिल्लक नसल्याचे सरळ अधिकारी सांगतात. त्यासाठी खासगी दुकानातून मिटर आणण्याचा आग्रह धरला जात आहे. खासगी दुकानात मिटर मिळू शकते मात्र वीज वितरण कंपनीला सरकारकडून मिटर मिळू शकत नसल्याबद्दल ग्राहकांतून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ठराविक दुकानातून मिटर आणण्याचा आग्रह धरला जात असल्यामुळे त्या अधिकारी कर्मचार्यांचे त्या दुकानदारांशी काही हितसंबंध आहेत का? असा प्रश्नही ग्राहकांना पडला आहे.

थकीत वीज बील भरणार्या ग्राहकांना वीज बील भरण्यासाठी सवलत व मुदत देण्यात यावी. उगाचच कायम कायम वीज तोडण्याची धमकी देऊन ग्राहकांना त्रास देण्याचा प्रयत्न वसुली करणार्या अधिकारी कर्मचार्यांनी करू नये, अशी मागणीही करण्यात येत आहे.