राहाता (तालुका प्रतिनिधी) -

राज्य सरकारमध्येच आता उर्जा राहिलेली नाही. सत्तेसाठी एकत्र आलेल्या पक्षांकडे जनतेसाठी कोणताही कार्यक्रम नसल्याने अवाजवी

वीज बिलाचे निर्णय जनतेवर लादले आहेत. वसुलीसाठी सक्ती कराल तर सरकारच्या विरोधात त्याचे विपरीत परिणाम दिसतील, असा इशारा भाजपाचे ज्येष्ठ नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला.

भारतीय जनता पक्षाच्यावतीने आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली वीज कंपनीच्या विरोधात राहाता येथे हल्लाबोल आणि टाळे ठोको आंदोलन करण्यात आले. वीज बिल भरण्याची होत असलेली सक्ती, वीज कनेक्शन तोडण्याच्या कंपनीच्या निर्णयाचा यावेळी निषेध करून शंभर युनिटपर्यंत मोफत वीज देण्याची मागणी यानिमित्ताने करण्यात आली. माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, सभापती नंदाताई तांबे, गणेश कारखान्याचे चेअरमन मुकुंदराव सदाफळ, बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब जेजूरकर, व्हा. चेअरमन प्रतापराव जगताप, उपसभापती ओमेश जपे, बाळासाहेब जपे, माजी नगराध्यक्ष कैलास सदाफळ, अॅड. रघुनाथ बोठे, नंदकुमार जेजूरकर, डॉ. के. वाय. गाडेकर, शिर्डी शहराध्यक्ष सचिन शिंदे, रावसाहेब देशमुख, कानीफ बावके, भाऊसाहेब शेळक, डॉ. धनंजय धनवटे यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकारी, शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते.

आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी वीज वितरण कंपनीच्या कारभारावर सडकून टीका केली. कोव्हिड काळात अडचणीत आलेल्या नागरिकांना आणि शेतकर्यांना दिलासा देण्याची आवश्यकता होती. पण या बिघाडी सरकारने भरमसाठ रकमेची वीज बिले पाठवून राज्यातील जनतेची जाणीवपूर्वक कोंडी केली असल्याचा आरोप केला.

मोफत वीज देण्याची मागणी कोणी केली नव्हती. मंत्री घोषणा करून मोकळे झाले. या तीन पक्षांच्या सरकारात फक्त पदांसाठी संघर्ष सुरू आहे. मुख्यमंत्र्यांना सरकारमध्ये काय चाललयं समजत नाही. उपमुख्यमंत्री निर्णय झाले नसल्याचे सांगतात, काँग्रेसचे अस्तित्वच सरकारमध्ये नाही. त्यामुळे या आघाडी सरकारमध्येच आता उर्जा राहिली नाही. उर्जा राज्यमंत्री या जिल्ह्यातील आहेत तरी शेतकर्यांना नागरिकांना रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ येते हे दुर्दैव असल्याचे विखे पाटील म्हणाले. वीज बिलाच्या संदर्भात गावात येऊन अधिकार्यांनी सक्ती केली तर त्याचे विपरीत परिणाम होतील त्यामुळे वेळीच ग्राहकांची बील दुरूस्त करून देण्याची मागणी त्यांनी केली.

माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, भाजपाचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र गोंदकर, रावसाहेब देशमुख, उपासभापती बाळासाहेब जपे, नंदकुमार जेजूरकर यांची भाषणं झाली. आघाडी सरकारच्या विरोधात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली. वीज वितरण कंपनीच्या अधिकार्यांना यावेळी निवेदन देण्यात आले.