भोकर येथे विजेच्या धक्क्याने कणगरच्या तरुणाचा मृत्यू

दैव बलवत्तर म्हणून चौघे बचावले
भोकर येथे विजेच्या धक्क्याने कणगरच्या तरुणाचा मृत्यू

भोकर |वार्ताहर| Bhokar

विहिरीचे खोदकाम सुरू असताना विजेचा शॉक बसून कणगर (ता. राहुरी) येथील आरबाज शेख (वय 22) या तरुणाचा मृत्यू झाला. श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथे ही दुर्घटना घडली.

भोकर परीसरातील वडजाई शिवारात रविंद्र गोविंद काळे यांचे गट नं.140 मध्ये पन्नास फूट विहीर खोदाईचे काम सुरू होते. हे काम राहुरी तालुक्यातील निसार शेख यांनी घेतले आहे. दुसर्‍या पिढीपासून शेख कुटुंबिय विहीर खोदाईचे काम करतात. कधी मनुष्यबळ तर कधी पोकलेनच्या साहाय्याने विहिरीचे खोदकाम सुरू होते. बुधवार दि.23 मार्च रोजी सकाळी ब्लास्टींग करून पोकलेनच्या साहाय्याने त्यातील मटेरीयल काढण्याची तयारी सुरू असताना विहिरीतील पाणी काढण्यासाठी असलेल्या वीज मोटारच्या वायरचा वीजपुरवठा पोकलेनच्या बकेटमध्ये व त्यातून विहिरीत उतरला. जवळच असलेला निसारभाई शेख यांचा धाकटा मुलगा आरबाज निसार शेख (वय 22) याला विजेचा धक्का बसल्याने तो गंभीर जखमी झाला. यावेळी त्याचा मोठा भाऊ शाहबाज याचेसह चौघेजण विहिरीतच होते. परंतु उर्वरीत चौघे केवळ दैव बलवत्तर म्हणून बचावले. सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान ही दुर्घटना घडली.

हा प्रकार लक्षात येताच आरबाज याला रुग्णालयात हलविले, प्रथम खाजगी व नंतर साखर कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारापुर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी घोषित केले.

याप्रकरणी तालुका पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पो.नि. मच्छिंद्र खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.काँ. शरद गायमुखे करीत आहेत.

मयत आरबाज याचा मृतदेह शवविच्छेदनानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. सायंकाळी कणगर येथे शोकाकूल वातावरणात त्याचा दफनविधी झाला. त्याच्या पश्चात वृद्ध आई, वडील, एक भाऊ व भावजयी असा परीवार आहे. आरबाज याची सोयरीक जमली होती, पुढील महिन्यात साखरपुडा व विवाहाची तयारी सुरू होती. या दुर्घटनेने शेख कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com