विजेच्या धक्क्याने शेतकर्‍याचा दुर्दैवी मृत्यू

विजेच्या धक्क्याने शेतकर्‍याचा दुर्दैवी मृत्यू

तळेगाव दिघे |वार्ताहर| Talegav Dighe

संगमनेर तालुक्यातील निळवंडे शिवारात शेतातील डाळिंब बागेला औषध मारत असताना इलेक्ट्रिक लाईटच्या तुटलेल्या तारेमुळे विजेचा धक्का बसून शेतकर्‍याचा मृत्यू झाला. विजय साहेबराव पवार (वय 46) असे मृत्यू झालेल्या शेतकर्‍यांचे नाव आहे. रविवार दि. 16 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेने निळवंडे गावावर शोककळा पसरली आहे.

निळवंडे येथील प्रगतिशील शेतकरी विजय साहेबराव पवार हे त्यांच्या शेतातील डाळिंब बागेला औषध मारत होते. मात्र शनिवारी झालेल्या वादळी पावसात इलेक्ट्रिक लाईटची वायर तुटून शेतात पडलेली होती. दरम्यान विजय साहेबराव पवार यांना विजेचा धक्का बसला. त्यांना अत्यवस्थ अवस्थेत उपचारासाठी संगमनेर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी भाऊसाहेब रामनाथ पवार (रा. निळवंडे) यांनी पोलिसांना खबर दिली. त्यानुसार संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विष्णू आहेर अधिक तपास करत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com