
कर्जत |प्रतिनिधी| Karjat
शेती पंप चोरी करून त्याची विक्री करणार्यास कर्जत पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्याकडून 50 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पप्पू उर्फ हरिचंद्र दत्तात्रय मांडगे (रा. रेहकुरी, ता. कर्जत) असे पकडण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, वालवड कर्जत रोडने एक इसम मोटरसायकलवर इलेक्ट्रिक मोटर मांडून विक्री करण्यासाठी घेऊन येत आहे आणि ती चोरीची आहे.
तात्काळ गुन्हे शोध पथकातील पोलीस पथक शहरातील दादा पाटील कॉलेज जवळ सापळा लावून थांबले आणि यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक विचारपूस केली असता पाण्याची मोटर चोरी करून आणल्याचे कबूल केले. पोलीस स्टेशनला त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्याच्या ताब्यातून एक पाच हॉर्स पॉवरची मोटर आणि एक मोटरसायकल असा 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार सलीम शेख करत आहेत. पोलीस जवान शाम जाधव, पांडुरंग भांडवलकर, गोवर्धन कदम शकील बेग यांनी ही कारवाई केली आहे.